रक्तदात्यांनी दिला श्रेष्ठदानाचा संदेश

By Admin | Updated: July 3, 2016 00:47 IST2016-07-03T00:25:57+5:302016-07-03T00:47:20+5:30

औरंगाबाद : एकदा रक्तदान केले तर आपण चार जणांचा जीव वाचवू शकतो, या भावनेने प्रेरित झालेल्या रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

Messages of donations donated by donors | रक्तदात्यांनी दिला श्रेष्ठदानाचा संदेश

रक्तदात्यांनी दिला श्रेष्ठदानाचा संदेश

औरंगाबाद : एकदा रक्तदान केले तर आपण चार जणांचा जीव वाचवू शकतो, या भावनेने प्रेरित झालेल्या रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. याद्वारे रक्तदान श्रेष्ठदानाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला.
प्रसंग होता ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमतचे संस्थापक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. एपीआय कॉर्नर येथील सागर लॉन येथे सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. प्रत्येक जण स्वेच्छेने रक्तदानासाठी शिबिरात येत होते. त्यातील काही जणांनी यापूर्वीही रक्तदान केले होते तर काही जणांनी आज पहिल्यांदाच रक्तदान केले. आपल्या रक्तदानामुळे चार जणांचा जीव वाचू शकतो, या भावनेने सर्व जण प्रभावित झाले होते. शिबीर सुरूहोण्यापूर्वी लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयलचे अध्यक्ष मनोज बोरा यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर लायन्सचे विशाल दरगड, सचिन ओस्तवाल, नंदकिशोर वर्मा, अनुज चांडक, आनंद सोनी, गणेश जाधव, एम. जे. शेख, गौतम जैन, प्रमोद डेरे, ओम अग्रवाल यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात केली. लायन्सचे सर्व पदाधिकारी, सदस्य या शिबिरात रक्तदान करीत होते. प्रकल्प प्रमुख दिनेश मुथा यांनी सांगितले की, समाजातील जास्तीत जास्त लोकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याकरिता अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांचा मोठा हातभार लागत आहे. आम्ही डी हेल्थ डॉट इन या अ‍ॅपद्वारे शहरातील सुमारे ८ हजार रक्तदात्यांची यादी तयार केली आहे, याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. पारस ओस्तवाल म्हणाले की, दरवर्षी मार्च ते सप्टेंबर या काळात रक्तसंकलन कमी होते. यासाठी लायन्स क्लबच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेत असतो. या शिबिरात समाजातील सर्व स्तरातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आज दुपारी २ वाजेपर्यंत शिबिराची वेळ होती, पण वेळ संपली तरी रक्तदाते रक्तदानासाठी येत होते, हे विशेष.
दोन रक्तपेढींनी केले रक्तसंकलन
या रक्तदान शिबिरात दोन रक्तपेढींनी रक्तसंकलन केले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी विभागीय रक्तपेढी व लायन्स ब्लड बँकेचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Messages of donations donated by donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.