दुष्काळाचा निरोप सोहळा, शिक्षणाचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: December 17, 2015 00:20 IST2015-12-16T23:47:23+5:302015-12-17T00:20:08+5:30

नांदेड :भारतीय जैन संघटनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात २१ मुलांना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविले आहे़

Message of drought, open the way for education | दुष्काळाचा निरोप सोहळा, शिक्षणाचा मार्ग मोकळा

दुष्काळाचा निरोप सोहळा, शिक्षणाचा मार्ग मोकळा

नांदेड :जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या भारतीय जैन संघटनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात २१ मुलांना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविले आहे़ बुधवारी माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांच्या निवासस्थानावरुन या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला़ समाजाच्या वतीने आतापर्यंत एकुण ५० विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे़
सध्या मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण छाया आहे़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यात या शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे़ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेकांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले आहे़ याबाबत भारतीय जैन समाजाने पुढाकार घेत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली़ पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली़
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीवरुन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील १७० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे दोन वेळा सर्वेक्षण करण्यात आले़ त्यातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली़ १ डिसेंबर रोजी ३१ विद्यार्थ्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते़ त्यानंतर बुधवारी दुसऱ्या टप्प्यात आणखी २१ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले़ यापूर्वी डॉ़अनिल पाटील हे विद्यार्थ्यांसोबत काळजीवाहक म्हणून गेले होते़ यावेळी गणेश आणि शिरभाते यांनी ही जबाबदारी स्विकारली़ पोकर्णा यांच्या निवासस्थानी या सर्व १९ विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले़ आपुलकीने यावेळी अनेकांनी त्यांची विचारपूस केली़
पोकर्णा परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना साहित्य भेट म्हणून देण्यात आले़ तर मुन्ना जैन यांच्या वतीने स्कुल बॅग किट देण्यात आली़ यावेळी कार्यक्रमाला माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा, आनंद जैन, डॉ़अनिल पाटील, नवल पोकर्णा, राजीव जैन, ऋषिकेश कोंडेकर, अजित मेहर, मनोज श्रीमाळ, महावीर लोहांडे, दीपक कोठारी, राम पाटील रातोळीकर, संजय कौडगे, अजय बिसेन, शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी यांची उपस्थिती होती़
इच्छुकांना चार दिवसांची मुदत
पुणे येथे शिक्षणाला पाठविण्यासाठी विद्यार्थी संख्येची मर्यादा नसून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १७० पैकी आतापर्यंत ५७ कुटुंबातील विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे़ आणखी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास संघटना तयार असून त्यांनी येत्या चार दिवसात संपर्क साधावा असे आवाहन डॉ़अनिल पाटील यांनी केले आहे़
मुलींना व्हायचंय शिक्षिका
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये १९ मुली तर ३१ मुलांचा समावेश आहे़ यातील मुलींनी शिक्षिका होण्याचा तर मुलांनी पीएसआय होण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले़
ही मुले शिक्षणासाठी पुण्यात
बुधवारी पुण्याला शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिनेश सुभाष जाधव, अजय सुभाष जाधव, मनिषा गौतम निवडंगे, श्रीकांत प्रकाश यमजलवाड, मनोज कैलास तिवडे, विकास दत्ता बोईनवाड, नामदेव प्रभाकर इंगोले, जनार्दन मधुकर कदम, दीपक विठ्ठल वसूरे, निशा सुदामराव हिंगमिरे, श्वेता शिवराज हिंगमिरे, शितल शिवाजी गुबरे, सत्यजित शिवाजी गुबरे, शैलेष शिवाजी गुबरे, प्रदीप किशनराव गुबरे, प्रतिक्षा किशनराव गुबरे, शिलवंत हिरामण तुळसे, आकाश साईनाथ तोटावाड, उमेश व्यंकटी सुर्यवंशी, अनिल किशन कागणे व सुनील किशन कागणे यांचा सहभाग आहे़

Web Title: Message of drought, open the way for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.