पारा ४२ अंशांवर गेल्याने जालनेकर त्रस्त
By Admin | Updated: April 29, 2015 00:52 IST2015-04-29T00:35:53+5:302015-04-29T00:52:46+5:30
जालना : शहरात यंदाच्या तापमानाचा उच्चांक मंगळवारी नोंदला गेला. पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना कडक उन्हाचे चटके जाणवले.

पारा ४२ अंशांवर गेल्याने जालनेकर त्रस्त
जालना : शहरात यंदाच्या तापमानाचा उच्चांक मंगळवारी नोंदला गेला. पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना कडक उन्हाचे चटके जाणवले. लग्नसराईत वऱ्हाडी मंडळींचे मात्र या उन्हामुळे मोठे हाल झाले.
उन्हाळा सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपर्यंत देखील पारा ३६ अंशापुढे सरकला नव्हता. अवकाळी पाऊस, गारपिट, सतत ढगाळ वातावरण यामुळे भर उन्हाळ्यातही पावसाळा असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या १२ दिवसांपासून मात्र तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सियस दरम्यान नोंदले जात होते.
मंगळवारी सकाळपासूनच कडक ऊन जाणवू लागले. दुपारी ३ वाजता उन्हाचा पारा ४२ अंशावर पोहोचला. उन्हामुळे अनेकांनी घरी विश्रांती घेणे पसंत केले. परंतु ज्यांना कामानिमित्त बाहेर ये-जा करणे टाळणे अशक्य होते, त्यांनी रूमाल, गॉगल्सचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
नवीन मोंढ्यात दुपारी १ ते ४ या दरम्यान, कामगारांनी विश्रांती घेणे पसंत केले. या काळात मालाची आवकही झाली नाही. गर्दीची ठिकाणे वगळता शहरात अन्य रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट होता. यंदा तापमानात प्रथमच वाढ झालेली दिसून आली.
लग्नसराईमुळे शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. बाजारपेठेतही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. (प्रतिनिधी)
२८ एप्रिल ही लग्नसराईतील दाट तिथी असल्याने आज शहरातील जवळपास सर्व मंगल कार्यालयांमध्ये लग्नसराईची धूम होती. वाढत्या उन्हामुळे लग्नसराईतील अबालवृद्धांचे मोठे हाल झाले. मात्र नवरदेवासमवेत निघालेल्या मिरवणुकांमध्ये तरूणांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले.
४वऱ्हाडी मंडळी या मिरवणुकीमध्ये जेथे सावली असेल, अशा ठिकाणी जाऊन थांबणे पसंत करीत होते. वृद्ध मंडळींनी अशा मिरवणुकीपासून स्वत:ला दूर ठेवत मंगल कार्यालयात थांबणे पसंत केल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी रिकाम्या पाणी पाऊच पडल्याचे चित्रही दिसून आले.
कडक उन्हामुळे आज शहरातील विविध थंडपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी नेहमीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. लग्नसराईमुळे परगावाहून शहरात आलेल्या पाहुण्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक या परिसरातही ग्राहकांची गर्दी दिसून आली. उन्हाच्या कडाक्यातून सुटका म्हणून सायंकाळी मोतीबागेतही गर्दी दिसून आली.