मर्कटलिलांनी वेरुळकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:01 IST2018-05-29T00:01:17+5:302018-05-29T00:01:45+5:30
वन विभागाचे दुर्लक्ष : चावा घेतल्याने कर्मचारी जखमी

मर्कटलिलांनी वेरुळकर त्रस्त
वेरूळ : मर्कटलिलांनी वेरुळकर त्रस्त झाले असून वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सोमवारी लेणी कर्मचाऱ्याला लाल माकडाने चावा घेतल्याची घटना घडली.
लेणी परिसरात काळ्या वानरांची संख्या शेकडोंच्या घरात असून त्यात दोन लाल माकडेही आहेत. काळ्या तोंडाच्या वानरांवर लाल माकडांचे वर्चस्व असल्याने त्यातून माकडांच्या टोळ्यात वारंवार भांडणे होतात. आलेले पर्यटक या माकडांना पाहून खाद्यपदार्थ देतात. त्यामुळे माकडांच्या टोळ्या पर्यटकाजवळील खाद्यपदार्थ हिसकावून घेण्याच्या घटना येथे तर नित्याच्याच झालेल्या आहेत.
त्यात लेणी कर्मचारी शेख बशीर हे कामावर जात असताना लाल माकडाने त्यांच्यावर झडप मारून खाली पाडले व पायाला चावा घेऊन जखमी केले. जवळपास असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्याने माकडाने तेथून पळ काढला. रविवारीही येथील व्यावसायिक भास्कर गाडगे यांनाही माकडाने चावा घेतला होता. शेख बशीर यांना जलद प्रतिसाद दलाचे राम माळी यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले.
यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभागाने पर्यटक आणि लेणी कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी वन विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून कळविले. परंतु आजपर्यंत वन विभागाने या माकडांचा बंदोबस्त केला नाही. त्यामुळे पर्यटक, कर्मचारी, व्यावसायिक मर्कट लिलांनी त्रस्त झाले आहेत.