शेतकऱ्यांना मानसिक आजार
By Admin | Updated: April 7, 2016 00:19 IST2016-04-07T00:04:38+5:302016-04-07T00:19:05+5:30
गजेंद्र देशमुख , जालना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना मानसिक आधार देण्यासाठी शासनाने १४ जिल्ह्यांत प्रेरणा प्रकल्प प्रकल्प सुरू केला आहे.

शेतकऱ्यांना मानसिक आजार
गजेंद्र देशमुख , जालना
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना मानसिक आधार देण्यासाठी शासनाने १४ जिल्ह्यांत प्रेरणा प्रकल्प प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गत पाच महिन्यांत १ लाख ७६ हजार ८६४ शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५ हजार ३६१ शेतकरी विविध मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे १४० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेत आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्यांचा शोध घेण्यासाठी, मानसिक समस्या तपासण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य सृदढ रहावे म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयत काही आरोग्य केंद्रात प्रेरणा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१५ पासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
प्रेरणा प्रकल्पाच्या प्रमुख मनसोपचार तज्ज्ञ डॉ. एम.बी. मुळे यांनी सांगितले की, नोव्हेंबरपासून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा मानसिक अभ्यास करण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यानुसार काही आजार आढळून आल्यास समुपदेशन करतो. गत पाच महिन्यांत जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ८८४ शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली.
यात ५ हजार ३६१ शेतकऱ्यांना मानसिक आजार असल्याचे समोर आले आहे. १२१७ शेतकऱ्यांमध्ये उदासिनतेचे प्रमाण तीव्र आहे. ४१८ शेतकरी व्यसनाधिनतेच्या विळख्यात आहेत. उदासिनतेमुळे काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे या चाचण्यांमध्ये स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ४४४ जणांना योग्य मानसिक समुपदेशन करण्यात आले आहे.
त्यांच्या मनात असलेले काही टोकाचे न्यूनगंड दूर करण्यासाठी समुपदेशन पद्धती वापरण्यात येत असल्याचे मुळे यांनी सांगितले. तीव्र उदासिनता असलेल्या १९८ तर व्यसनाधिनता असलेल्या १५७ रूग्णांना अंतरूग्ण विभागातंर्गत उपचार करण्यात आले आहेत. पाच महिन्यांपासून प्रेरणा प्रकल्प जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असून, शेतकऱ्यांची परिपूर्ण मानसिक तपासणी तसेच त्यांना औषधोपचार करून त्यांना ताणतणावमुक्त करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता पाटील यांनी सांगितले.
प्रेरणा कक्षात विविध प्रकारचे मिळून पाच मनसोपचार तज्ज्ञ आहेत. शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचे काम या ठिकाणी होत आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभही झाला आहे. त्यांना योग्य ते समुपदेशन व औषधोपचार केल्यानंतर त्यांच्यात सुधारणा झाल्याचे डॉ.एम.बी.मुळे यांनी सांगितले.
४जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुळे यांनी केले. त्याचबरोबर इतर आजारांसाठीही राजीव गांधी आरोग्य योजनेतून शेतकऱ्यांना औषधोपचारासाठी मदत मिळते.
बहुतांश शेतकऱ्यांमध्ये शेतीमुळे नुकसान झाल्याने उदासिनता येते. हे प्रमाण तीव्र स्वरूपाचे झाल्यावर शेतकरी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊस उचलच असल्याचे अभ्यासावरून समोर येत आहे. व्यवसनाधिनताही एक मोठे कारण आत्महत्येस कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना तणावमुक्त जीवन जगण्यााठी घ्यावायाचे उपाय तसेच मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे.
जिल्हा सामान्य रूग्णाल, उपजिल्हा रूग्णालय तसेच काही आरोग्य केंद्रांमध्ये प्रेरणा प्रकल्पाचे काम सुरू असून, तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. त्याचबरोबर भोकरदन, परतूर, राणीउंचेगाव, सोमनाथ जळगाव येथे शिबीर घेऊन शेतकऱ्यांची तपासणी करण्यात येऊन सुमपदेशन करण्यात येत असल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या मनासोपचार तज्ज्ञ डॉ. मुळे यांनी सांगितले.