मुंडे-देशमुखांच्या आठवणींना उजाळा
By Admin | Updated: June 4, 2014 01:30 IST2014-06-04T01:01:58+5:302014-06-04T01:30:57+5:30
लातूर : केंद्रात मंत्री झाल्यावर सत्कारासाठी लातूरच्या विमानतळावर उतरणारे त्यांचे पाय आता अंत्यदर्शनासाठीच दिसणार आहेत़

मुंडे-देशमुखांच्या आठवणींना उजाळा
लातूर : केंद्रात मंत्री झाल्यावर सत्कारासाठी लातूरच्या विमानतळावर उतरणारे त्यांचे पाय आता अंत्यदर्शनासाठीच दिसणार आहेत़ गोपीनाथ मुंडे यांचा लातूरच्या विमानतळावर नेहमीचाच वावर राहिलेला आहे़ मुंबई-दिल्लीला जाण्यासाठी बहुतांश वेळा व्यस्त कार्यक्रमात त्यांनी लातूरच्या विमानतळाचा आधार घेतलेला आहे़ किंबहुना उद्घाटनापुर्वी नाईट लँडींगची चाचणी त्यांच्याच विमानाने झाली़ आता या विमानतळावर गोपीनाथ मुंडे यांचे शेवटचेच दर्शन राहणार आहे़ मुंडे यांचे पार्थीव घेवून येणार्या विमानासोबत अन्य मान्यवर व्यक्तींची विमाने लातूरच्या विमानतळावर लँड होणार आहेत़ मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे सात मान्यवरांनी त्यांची विमाने लँड होण्यासाठी लातूरच्या प्रशासनाकडे फॅक्ससंदेशाद्वारे कळविलेले आहे़ त्यांच्या सुविधेसाठी एक उपजिल्हाधिकारी, दोन तहसीलदारांसह प्रशासकीय ताफा सज्ज ठेवल्याचे प्रशासकीय समन्वयक व उपजिल्हाधिकारी डॉ़अनंत गव्हाणे यांनी सांगितले़ जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी सर्व विभागाच्या बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवल्याचेही त्यांनी सांगितले़ २००६ मध्ये अंबाजोगाई येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी येत असताना अपघात होऊन त्यांच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबई गाठायची होती़ ही घटना कळताच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबईहून लातूरला विमान पाठवून दिले़ विमानतळाचे उद्घाटन झालेले नसताना आणि नाईट लँडींगची टेस्टींग होण्याची प्रक्रीया पूर्ण झालेली नसतानाही विमान लातूरला आले़ विमान निश्चीत जागेवर उतरावे यासाठी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विमानतळावर तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव मित्तल, तहसीलदार अविनाश रणखांब, महेश शेवाळे आदी उपस्थित अधिकार्यांनी आपल्या वाहनाच्या हेडलाईटचा उजेड केला होता, अशी माहिती घटनेचे साक्षीदार तहसीलदार महेश शेवाळे यांनी दिली़ लातूरच्या विमानतळावर एका दिवसात तब्बल ७२ उड्डाणे झालेली आहे़ १४आॅगस्ट२०१२रोजी लोकनेते विलासराव देशमुख यांचे पार्थिव याच विमानतळावर आले होते़ त्याच दिवशी तब्बल ७२ उड्डाणे झालेली आहेत़ तसेच विलासरावांच्या गोडजेवणाच्या दिवशीही ४० उड्डाणे झालेली आहेत़