इच्छुकांच्या ताफ्यासह सदस्य सहलीवर

By Admin | Updated: September 11, 2014 00:36 IST2014-09-11T00:31:29+5:302014-09-11T00:36:44+5:30

जालना : जिल्ह्यात आठही पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक १४ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेद्वारे होणार आहे.

Members trips with the tastes of intentions | इच्छुकांच्या ताफ्यासह सदस्य सहलीवर

इच्छुकांच्या ताफ्यासह सदस्य सहलीवर

जालना : जिल्ह्यात आठही पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक १४ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेद्वारे होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सदस्य संख्येचे गणित लावत काही इच्छुकांनी सदस्यांना सहलीवर रवाना केले आहे.
जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा या आठ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे काही सदस्य तर गणेशोत्सवापासूनच सहलीवर रवाना झाले आहेत. काही पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहूमत आहे. तर काही ठिकाणी भाजपा-सेना युतीचे बहूमत आहे. जालना पं.स. मध्ये एकट्या मनसेच्या सदस्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे हे सदस्यही सहलीवर रवाना झाले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये आपापल्या राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींतर्फे होत आहे. तर यामध्ये फोडाफोडीचे राजकारण करण्याची कूटनितीही काहीजण अवलंबवित असल्याची चर्चा आहे. मात्र जिल्ह्यातील नेतेमंडळींचा निर्णय हाच अंतिम ठरणार, अशी राजकीय स्थिती आहे. (प्रतिनिधी)
जामवाडी (जालना) - जालना पंचायत समितीमध्ये एकूण सदस्य संख्या १६ आहे. सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी राखीव असून पक्षनिहाय बलाबल शिवसेना ७, भाजपा १, मनसे १, काँग्रेस ३, राकाँ ३, जेथलिया समर्थक १ असे आहे. सभापती पदासाठी सेनेच्या धु्रपदाबाई मुरलीधर थेटे, गंगासागर माधवराव टकले, सचिन भांदरगे तसेच काँग्रेसकडून सुमनबाई रतनराव कावले, विद्यमान उपसभापती सोपान तिरूखे व राष्ट्रवादीकडून ब्रह्मा वाघ हे इच्छूक आहेत.
बदनापूर - पं.स. सभापतीपद सर्वसाधारण पदासाठी राखीव आहे. राकाँचे ४, काँग्रेसचे २, मनसे २ , भाजपा १ व सेना १ असे एकूण १० सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सभापती पार्वती मदन या पुन्हा इच्छूक आहेत. मात्र त्यांच्यासोबतच मुक्ता बरांडे, रेणुका कोल्हे, शेख आदनान हेही इच्छूक आहेत. यामधील काही सदस्य सध्या सहलीचा आनंद घेत आहेत.
जाफराबाद - पंचायत समितीचे सभापती पद मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातील एकमेव भाजपाच्या सदस्या रमाबाई चोथमल यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे. एकूण सदस्य संख्या १२ असून यात भाजपा ७, शिवसेना ३, काँग्रेस व राकाँ प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. उपसभापती पदासाठी रमेश गायकवाड, रामदास जगताप, दिनकर उखर्डे हे इच्छूक आहे.
अंबड - पंचायत समितीचे सभापती पद महिला इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. एकूण सदस्य संख्या १६ असून यात राष्ट्रवादी काँग्रेस ११, ४ शिवसेना तर १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. सभापती पदासाठी वडीगोद्री गणातील सदस्या ज्योती संजय गावडे या इच्छूक असून त्यांच्याच नावाची चर्चा आहे. काही सदस्य ७ सप्टेंबर रोजी सहलीवर रवाना झाले.
भोकरदन - पंचायत समितीमध्ये भाजपा-सेना युतीचे स्पष्ट बहूमत असल्याने येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे सांगतील, त्याच सभापती अशी स्थिती आहे. सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. एकूण सदस्य संख्या २० असून यामध्ये भाजपा-सेना युती १३, राष्ट्रवादी काँग्रेस ५ तर काँग्रेसचे २ सदस्य आहेत. सभापती पदासाठी पारध गणातील संगीता परमेश्वर लोखंडे, कठोरा बाजार गणातील शमनूरबी इरफान पठाण तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे नवनाथ दौड हे इच्छूक आहेत. बहुमतामुळे सदस्यांना सहलीवर जाण्याचा योग आलेला नाही.
मंठा- एकूण १२ सदस्य, शिवसेना ४, भाजपा १, काँग्रेस २, राकाँचे ५ असे पक्षीय बलाबल आहे. सभापती पद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित. इच्छुकांमध्ये शिवसेनेकडून उर्मिलाताई सरोदे, राकाँकडून लताताई भगवानराव राठोड, उपसभापती पदासाठी उषाताई कदम या इच्छूक आहे. सेनेचा सभापती व काँग्रेसचा उपसभापती अशी अभद्र युती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
परतूर- पं.स. ची एकूण सदस्य संख्या १० आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ३, काँग्रेस १, शिवसेना १ आणि भाजपाचे ५ असे पक्षीय बलाबल आहे. सभापती पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. इच्छुकांमध्ये कपिल आकात, छाया हरिराम माने यांचा समावेश आहे. फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. दहाही सदस्य सहलीवर रवाना झालेले आहेत.
घनसावंगी - पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. एकूण सदस्य संख्या १४ असून त्यात सर्वोच्च १२ सदस्य शिवसेनेचे असल्याने सभापती आणि उपसभापती शिवसेनेचाच होणार हे निश्चित आहे. सभापती पदासाठी प्रेम खेमा राठोड, डॉ. राऊत, प्रल्हाद वऱ्हाडे हे इच्छूक आहेत. उपसभापती पदासाठी सोनिया मरकड आदी इच्छूक आहेत.

Web Title: Members trips with the tastes of intentions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.