सेनगाव तालुक्यात पीककर्जासाठी मेळावे
By Admin | Updated: June 25, 2017 23:39 IST2017-06-25T23:27:01+5:302017-06-25T23:39:35+5:30
सेनगाव : शेतकऱ्यांना सुलभतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

सेनगाव तालुक्यात पीककर्जासाठी मेळावे
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : शेतकऱ्यांना सुलभतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी पीककर्ज मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून सेनगाव तालुक्यातील व्यापारी बँकाच्या आठ शाखांमध्ये पीककर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत.
पीककर्ज वाटप अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सुलभ व सहजतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी सेनगाव तहसील कार्यालयात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील स्टेट बँक इंडिया, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी तीन बँकांच्या आठ शाखांच्या शाखेंच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
दरम्यान, यावेळी बैठकीत शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करण्याच्या अनुषंगाने कर्ज मेळाव्याचे नियोजन करण्यात आले.
तालुक्यातील मध्यवर्ती बँक शाखा वगळता अन्य व्यापारी बँकांमध्ये पीककर्ज मेळाव्याचे आयोजन गावनिहाय करण्यात आले आहे. या अनुषंगाने २८ जून रोजी सेनगाव येथील भारतीय स्टेट बँकेत मेळावा होणार आहे. तर ३ जुलै रोजी गोरेगाव येथील स्टेट बँक इंडिया, १३ जुलै रोजी सेनगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखा तसेच १४ जुलै रोजी पानकनेरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक, १८ जुलै रोजी सेनगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, २१ जुलै रोजी आजेगाव तर २२ जुलै रोजी पुसेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळाव्यात नियमीत खातेदारांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून मेळाव्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.