अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्यावर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:13 IST2017-08-10T00:13:57+5:302017-08-10T00:13:57+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळ समितीची बैठक गुरुवार, १० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे

अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्यावर बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळ समितीची बैठक गुरुवार, १० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. विविध १३ शासकीय कार्यालयांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीत शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार कोणती धार्मिक स्थळे अधिकृत करता येऊ शकतात, कोणती करता येणार नाहीत. या मुद्यांवर अंतिम निर्णय होणार आहे. नागरिकांकडून सूचना आणि हरकती कधी मागवायच्या यावरही बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेने ११०१ धार्मिक स्थळांची यादी तयार केली होती. या यादीनुसार कारवाई करण्याचे आदेश खंडपीठाने २१ जुलै रोजी दिले होते. मनपाने आतापर्यंत ४६ पेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे काढली आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. ८ आॅगस्ट रोजी खंडपीठाने पुन्हा एकदा धार्मिक स्थळ प्रकरणी सूचना आणि हरकती मागविण्याची मुभा मनपाला दिली. त्यानुसार उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता धार्मिक स्थळ समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, वक्फ सीईओ, सिडकोचे मुख्य प्रशासक, म्हाडा, वीज कंपनी आदी १३ विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत महापालिका प्रशासन न्यायालयाचे विविध आदेश, सद्य:स्थिती आदींची माहिती देणार आहे.
मनपाने तयार केलेल्या धार्मिक स्थळांच्या यादीनुसार ‘अ’वर्ग प्रवर्गातील ५०८ धार्मिक स्थळे नियमित करण्यासारखी आहेत. ‘ब’ वर्गातील ५९२ पैकी ३९१ धार्मिक स्थळे खाजगी जागेवर आहेत. सुमारे १९० धार्मिक स्थळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी आहेत, ही वस्तुस्थिती समितीसमोर मांडण्यात येणार असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. समिती यावर अंतिम निर्णय घेणार आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार नागरिकांकडून सूचना, हरकतीही मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापण करण्यात येणार आहेत.