व्यवस्थापन परिषदेची बैठक गुंडाळली
By Admin | Updated: January 4, 2015 01:14 IST2015-01-04T01:06:18+5:302015-01-04T01:14:19+5:30
औरंगाबाद : काही किरकोळ विषय मंजूर करून उर्वरित विषय पुढील बैठकीत ठेवण्याचा निर्णय घेत गुरुवारी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक गुंडाळण्यात आली.

व्यवस्थापन परिषदेची बैठक गुंडाळली
औरंगाबाद : काही किरकोळ विषय मंजूर करून उर्वरित विषय पुढील बैठकीत ठेवण्याचा निर्णय घेत गुरुवारी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक गुंडाळण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेची बैठक रत्नागिरी येथे २२ डिसेंबर रोजी घेतली. काही विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ न पुरल्यामुळे सदरील बैठक तहकूब करून ती आज १ जानेवारी रोजी घेतली. आजच्या तहकूब बैठकीच्या विषयपत्रिकेत ११ विषय होते. मात्र, सकाळपासूनच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे विविध कार्यक्रमांत व्यस्त राहिले. सकाळी उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या स्वागतासाठी कुलगुरू विमानतळावर गेले. विनोद तावडे हे बीड येथे कॉपीमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. त्यामुळे त्यांनी कुलगुरूंनाही सोबत येण्याचा आग्रह धरला. दुपारी घाई गडबडीत बीड येथील कार्यक्रम आटोपून कुलगुरू डॉ. चोपडे हे ३ वाजता विद्यापीठात पोहोचले. व्यवस्थापन परिषदेची बैठक तात्काळ सुरू करून ती अवघ्या दीड तासात गुंडाळली व ते पुन्हा जालना येथे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण व अन्य सदस्य उपस्थित होते.