छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यातून भेटी वाढल्यानंतर तरुणाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून ब्लॅकमेलिंग सुरू केले. मुलगी त्याच्या त्रासामुळे तणावाखाली असतानाच प्रियकराच्या मित्राने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. चिकलठाणा पाेलिस ठाण्यात बुधवारी अतुल संजय राठोड आणि यशवंत किसनराव पवार यांच्यावर याप्रकरणी बलात्कार, आयटी ॲक्टसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकरी कुटुंबातील आकांक्षा (नाव बदलले आहे) सध्या दहावीत शिकते. २ महिन्यांपूर्वी अतुलने तिला इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधून मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. आकांक्षाने त्याच्यावर विश्वास ठेवत संवाद सुरू केला. पुढे संपर्क क्रमांकाची देवाणघेवाण होत मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अतुलने तिला धमकावत तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिच्यासोबत व्हिडीओ कॉल करून ते रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केले.
यामुळे आकांक्षा तणावाखाली गेली. त्याच दरम्यान अतुलचा मित्र यशवंतने तिला संपर्क साधून छेडण्यास सुरुवात केली. तिला अश्लील स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या त्रासाला कंटाळून आकांक्षाने घरी हा प्रकार सांगितला. त्यानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच दोघे पसार झाल्याचे पेालिसांनी सांगितले.