वैद्यकीय अधिकारी संपावर, रुग्णसेवा विस्कळीत
By Admin | Updated: June 3, 2014 01:09 IST2014-06-03T01:01:51+5:302014-06-03T01:09:40+5:30
पाचोड : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (मॅग्मो) सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

वैद्यकीय अधिकारी संपावर, रुग्णसेवा विस्कळीत
पाचोड : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (मॅग्मो) सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवाच कोलमडली असून, खाजगी रुग्णालय मात्र आज हाऊसफुल दिसून येत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी हे राज्यातील ग्रामीण भागात, दुर्बल भागात, आदिवासी भागात राहून रुग्णांची सेवा करीत असतात. २०११ सालापासून शासन दरबारी विविध मागण्या प्रलंबित होत्या. यात सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलक्षी लाभ दिलेला नाही. राज्यातील वैद्यकीय अधिकार्यांना सहावा वेतन आयोग २००६ सालापासून लागू झालेला नाही. अस्थायी एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. व बी.डी.एस. वैद्यकीय अधिकार्यांना अजूनही स्थायी करण्यात आले नाही, आदी विविध मागण्या प्रलंबित होत्या व शासनाने त्या मागण्या मंजूरही केल्या आहेत; पण त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे अधिकार्यांनी अगोदर काळ्या फिती लावून काम सुरू केले होते; पण शासनाकडून काहीच उत्तर न आल्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दूरवरून येणार्या रुग्णांना उपचार न मिळाल्यामुळे भरउन्हात त्यांना माघारी परतावे लागले, तर काही रुग्णांनी खाजगी रुग्णालयाचा सहारा घेऊन उपचार घेतले. या वैद्यकीय अधिकार्यांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयातील वॉर्डात शुकशुकाट दिसून येत होता.(वार्ताहर) पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे आश्वासन आरोग्य उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण म्हणाले की, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी जरी काम बंद आंदोलन पुकारले असले तरीही सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवा कोलमडू देणार नाही. त्याची पर्यायी व्यवस्था केली असून, कंत्राटी डॉक्टर व राष्ट्रीय बालसुरक्षा विभागातील डॉक्टरांची नेमणूक ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात करून रुग्णसेवा केली जाईल. या काम बंद आंदोलनाविषयी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी भोजने म्हणाले की, नाइलाजास्तव आम्ही हे पाऊल उचलले आहे. आम्ही अत्यावश्यक सेवा, अपघातातील रुग्णांची तपासणी करणार असून, शवविच्छेदन आले तर करणार असल्याचे सांगितले.