वैद्यकीय संचालकांकडून घाटीची ‘तपासणी’
By Admin | Updated: July 21, 2015 00:19 IST2015-07-21T00:19:59+5:302015-07-21T00:19:59+5:30
औरंगाबाद : घाटीत सोमवारी वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी अचानक भेट देत विभागप्रमुखांची बैठक घेतली. काही महिन्यांपासून बंद

वैद्यकीय संचालकांकडून घाटीची ‘तपासणी’
औरंगाबाद : घाटीत सोमवारी वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी अचानक भेट देत विभागप्रमुखांची बैठक घेतली. काही महिन्यांपासून बंद पडलेले सिटी स्कॅन मशीन तात्काळ सुरू करण्यासह विविध रिक्त पदांसह विविध अडचणी सोडविण्यात येतील, असे डॉ. शिनगारे यांनी सांगितले.
न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी डॉ. शिनगारे आले होते. यावेळी घाटी रुग्णालयास भेट देत त्यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. येथील सिटी स्कॅन मशीन तीन महिन्यांपासून बंद आहे. ६५ स्लाईड असलेल्या या मशीनच्या दुरुस्तीसाठी तात्काळ दखल घेणार असल्याचे डॉ. शिनगारे यांनी सांगितले, तर पॅरामेडिकल, लिपिक, वरिष्ठ निवासी डॉक्टर अशा विविध विभागांतील पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच रेडिओथेरपी, मानसोपचार, त्वचारोग आणि क्षयरोग विभागांत पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्यासाठी तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
५० टक्के पद भरण्याचे अधिकार
पॅरामेडिकलच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे वाट बघावी लागते. या जागा न भरल्याने रुग्णांची गैरसोय होते. या जागांविषयी चर्चा करताना रिक्त जागांपैकी ५० टक्के रिक्त पद भरण्याचे अधिकार घाटी प्रशासनाला आहेत, तुम्ही त्या जागा भरून घ्या, असे डॉ. शिनगारे म्हणाले.
लिपिकांच्या जागाही भरण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ६१ पदे आहेत. त्यापैकी ३६ मंजूर करण्यात आली असून उर्वरित जागा घाटी प्रशासनाने भराव्यात, असे त्यांनी सांगितले.