..अखेर तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली सुरू
By Admin | Updated: November 13, 2014 00:49 IST2014-11-13T00:32:01+5:302014-11-13T00:49:40+5:30
जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे.

..अखेर तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली सुरू
जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने तीनपट वाढीव पाणीपट्टीची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे. या पाणीपट्टीची वसुली काटेकोरपणे होण्यासाठी दोन पथकांची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून तर जुना जालना भागात जायकवाडी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यातच जायकवाडी योजनेची देखभाल दुरूस्ती करण्यात आली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नगरपालिकेकडून आतापासूनच पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यात येत असल्याचा दावाही सूत्रांनी केला. परंतु अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. विद्युत पंप नादुरूस्त होणे असेही प्रकार घडतात.
या पार्श्वभूमीवर शहरात तीनपट वाढीव पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जायकवाडी योजनेला सुमारे दीड वर्षे पूर्ण होत आहेत. अद्याप म्हणावे तसे पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेकडून झालेले नाही.
त्यामुळे नागरिकांना आताच तीनपट वाढीवचा बोजा सहन होणार नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे अशा काळात तरी तीनपट वसुली करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना विचारणा केली असता, पाणीपट्टीचे दर तीनपट वाढीव करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेण्यात आला आहे, व त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च वाढल्याने पाणीपट्टीचे दरही वाढले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही अंमलबजावणी तुर्तास करू नये, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
जालना शहरात नागरिकांना पूर्वी पाणीपट्टीचे वार्षिक ८०६ रुपये दर आकारले जात होते. आता वार्षिक दर २७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच तीनपट वाढीव आकारणी होत आहे. परिणामी नागरिकांना भूर्दंड बसणार असून या वाढीची अंमलबजावणी सद्यस्थितीत तरी करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
४जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेवर दरमहा मोठा खर्च होत आहे. देखभाल, दुरूस्ती व वीज बिलांचा खर्च लाखोंच्या घरात गेलेला आहे. हा खर्च काढण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दीड वर्षापूर्वीच यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली.