वैद्यकीय प्राध्यापकांच्या नेहमीच्या उसनवारीला एमसीआयकडून चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 00:11 IST2016-06-14T00:04:41+5:302016-06-14T00:11:12+5:30
बापू सोळुंके , औरंगाबाद मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) इन्स्पेक्शन कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वैैद्यकीय शिक्षकांची उसनवारीवर बदली करून

वैद्यकीय प्राध्यापकांच्या नेहमीच्या उसनवारीला एमसीआयकडून चाप
बापू सोळुंके , औरंगाबाद
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) इन्स्पेक्शन कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वैैद्यकीय शिक्षकांची उसनवारीवर बदली करून नियुक्ती दाखविण्याच्या प्रकाराला आता कायमस्वरूपी चाप बसणार आहे. एमसीआयने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांना त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची माहिती एमसीआयच्या संकेतस्थळावर दोन दिवसांत अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या माहितीमुळे प्राध्यापकांची हेराफेरी कायमस्वरूपी रोखली जाणार आहे.
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून देशातील शासकीय वैैद्यकीय महाविद्यालय आणि खाजगी वैैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली जाते. एमसीआयच्या मान्यतेनेच ही वैैद्यकीय महाविद्यालये सुरू असतात. महाराष्ट्रात १४ शासकीय वैैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. शिवाय खाजगी वैैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तेवढीच आहे. एमसीआयने महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांच्या पदसंख्येबाबत निकष घालून दिलेले आहेत. एमसीआयच्या निकषानुसार वैैद्यकीय शिक्षकाची पदे भरलेली नसेल तर त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द होऊ शकते अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता काढली जाते. त्यामुळे एमसीआयच्या इन्स्पेक्शनप्रसंगी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून वैैद्यकीय शिक्षकांची पदे भरण्यात आलेली असल्याचे दाखविले जाते. राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयांपैैकी दरवर्षी दोन किंवा तीन महाविद्यालयांची दरवर्षी एमसीआयकडून तपासणी होत असते. त्या महाविद्यालयातील रिक्त पदावर अन्य शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या उसनवारीवर बदल्या केल्या जातात. केवळ एमसीआय इन्स्पेक्शनपुरत्या या बदल्या करून त्याची नियुक्ती त्या महाविद्यालयात दाखविण्यात येते. एमसीआयचे पथक तपासणी करून रवाना होताच पुन्हा त्यांना परत पाठविले जाते.
प्राध्यापकांची हेराफेरी थांबविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (पान ४ वर)
वैद्यकीय संचालकांच्या आदेशानुसार आम्ही एमसीआयच्या संकेतस्थळावर वैद्यकीय शिक्षकांची माहिती अपलोड केली आहे. यामुळे आता एमसीआयच्या इन्स्पेक्शनपुरत्या प्राध्यापकांच्या उसनवारीवर होणाऱ्या बदल्या टळतील. शिवाय प्राध्यापकांची रिक्त पदेही भरण्यात येतील.
डॉ. सुहास जेवळीकर, अधीक्षक, घाटी रुग्णालय