महापौर रुसल्या अन् कोपऱ्यात बसल्या !
By Admin | Updated: August 15, 2014 01:33 IST2014-08-15T01:03:02+5:302014-08-15T01:33:41+5:30
लातूर : दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपात करण्यात आले होते.

महापौर रुसल्या अन् कोपऱ्यात बसल्या !
लातूर : दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपात करण्यात आले होते. मात्र ११ वाजेपर्यंत महापौर मनपात आल्या नसल्याने उपस्थितांनी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेवढ्यात महापौरांचा मनपात प्रवेश झाला. संतप्त झालेल्या महापौरांनी आजचा अभिवादन कार्यक्रम तुम्ही केलात उद्याचे ध्वजारोहणही तुम्हीच करा, अशी भुमिका घेतल्याने दिवसभर नगरसेवकांनी मनधरणी केली़ शेवटी शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी मध्यस्थी केल्यानंतर महापौरांची नाराजी दूर झाली़
महापौर येण्याअगोदरच कार्यक्रम सुरू झाल्याचे पाहताच त्या थेट आपल्या कक्षात गेल्या अन् बाजूची साधी खुर्ची घेऊन बसल्या. आपला अवमान झाल्याचे लक्षात आल्याने त्या अभिवादन कार्यक्रमाकडे तब्बल तीन तासांनी आल्या अन् अभिवादन करून निघून गेल्या़ लातूर शहर महानगरपालिकेत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांश नगरसेवक ११ वाजण्याच्या अगोदरच मनपात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी दामाजी सोनफुले यांच्याकडे होते. ११ वाजून गेले तरी महापौर आल्या नसल्याने त्यांच्या गैरहजेरीतच कार्यक्रमाला सुरुवात झाली. नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ४ ते ५ मिनीट उशिरा आलेल्या महापौर थेट आपल्या कक्षात जावून बसल्या़ या घटनेची चर्चा दिवसभर सुरू होती़
महापौर पदाचा सन्मान राखायला हवा. प्रोटोकॉलप्रमाणे प्रतीक्षा करायला हवी होती. मात्र गुरुवारी मनपात झालेल्या कार्यक्रमात तसे झाले नाही. चुकीचा पायंडा पडू नये, यासाठी आपण अशी भूमिका घेतल्याचे महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी ध्वजारोहण करणार नसल्याची भूमिका महापौरांनी घेतल्याने पक्षश्रेष्ठींची पंचाईत झाली.