महापौर, अधिकाऱ्यांची तक्रार प्रधान सचिवांकडे
By Admin | Updated: September 13, 2014 00:35 IST2014-09-13T00:29:26+5:302014-09-13T00:35:10+5:30
औरंगाबाद : महापालिकेचा नगरसचिव विभाग आणि महापौर कला ओझा यांनी सभेमध्ये दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात उघडकीस आणला.

महापौर, अधिकाऱ्यांची तक्रार प्रधान सचिवांकडे
औरंगाबाद : महापालिकेचा नगरसचिव विभाग आणि महापौर कला ओझा यांनी ११ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेमध्ये एक, दोन नव्हे, तर सर्व नगरसेवकांची दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात उघडकीस आणला. त्या वृत्ताचा आधार घेत विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनी प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांच्याकडे महापौर, नगरसचिव व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
कार्यकारी अभियंतापदी पी.आर. बनसोड, अफसर सिद्दीकी यांना पदोन्नती दिल्याचा प्रस्ताव २३ जुलैपासून नगरसचिव विभागाकडे पडून होता. ११ आॅगस्टच्या सभेत तो ठराव ऐनवेळी का आणला. १८ दिवस प्रस्ताव विभागात पडून असताना सभेच्या मुख्य विषयपत्रिकेत तो आला नाही. शिवाय त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून का केली नाही. एकाच प्रस्तावाचे दोन कारणांंपुरते उतारे का तयार केले, असे अनेक प्रश्न गायकवाड यांनी पत्रातून नमूद केले आहेत.
पत्रात काय आहे?
विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अफसर सिद्दीकी, परमेश्वर बनसोडे यांना कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव गैरमार्गाने आणला असून तो बोगस आहे. महापौर व नगरसचिवांनी मनपाची दिशाभूल केली आहे.
पारित न झालेला ठराव मंजूर झाल्याचे दाखवून खोटे दस्तावेज तयार केले. शासनाची व पालिकेची फसगत केली आहे. या प्रकरणी चौघांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत.