महापौरांनी दिला गुंगारा
By Admin | Updated: May 26, 2015 00:51 IST2015-05-26T00:32:19+5:302015-05-26T00:51:10+5:30
औरंगाबाद : महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

महापौरांनी दिला गुंगारा
औरंगाबाद : महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोमवारी यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर त्र्यंबक तुपे यांनी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांना दिले होते. सोमवारी दोन्ही पक्षांचे नगरसेवक महापालिकेत आपल्या समर्थकांसह दाखल झाले. मात्र, महापौरांनी लग्न समारंभाचे कारण सांगून मनपात येण्याचे टाळले. तत्पूर्वी, महापौरांनी शहरातील ज्येष्ठ विधिज्ञांकडे सल्ला मागितला आहे.
महापालिका निवडणुका संपून एक महिना उलटला तरी अजून विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटलेला नाही. या पदावर काँग्रेस, एमआयएमने दावा दाखल केला आहे. महापौरांनी अगोदर निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला. आयोगाने मनपाला सल्लाच दिला नाही. त्यानंतर महापौरांनी नगरविकास विभागाकडे सल्ला मागितला. त्यांनी कारवाईचा चेंडू परत महापौरांच्या कोर्टात ढकलून दिला. पत्रव्यवहारात एक महिना गेल्यावर सोमवार, दि.२५ मे रोजी महापौरांनी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. महापौरांनी मनपात येण्याचे टाळले. सकाळीच खंडपीठातील विधिज्ञ अतुल कराड यांना एक पत्र महापौरांनी दिले. पत्रात एमआयएमचे संख्याबळ, काँग्रेसतर्फे करण्यात आलेली मागणी इ. मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. हे पत्र सायंकाळी प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आले. आपोआप पत्राची प्रत काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकांच्याही हातात पडली.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे २२ मे रोजी महापौरांना एक पत्र देण्यात आले. या पत्रात विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक अय्युब खान यांची निवड करावी, असे म्हटले आहे.
४आज दुपारी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अफसर खान यांनी महापौरांना पत्र दिले की, शहर काँग्रेसतर्फे नगरसेवकांच्या स्वक्षरीने देण्यात आलेले पत्र खोटे आहे. त्यावर माझ्याही नावाची सही करण्यात आलेली आहे.
४मी स्वत: विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असताना दुसऱ्याला सही देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अफसर खान यांच्या या पत्राने सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.