महापौर निवडणूक; अनिश्चिततेची चर्चा

By Admin | Updated: October 15, 2016 01:21 IST2016-10-15T01:10:52+5:302016-10-15T01:21:49+5:30

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा युतीतील करारानुसार महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आॅक्टोबर अखेरीस विद्यमान महापौर

Mayor election; Discussion of uncertainty | महापौर निवडणूक; अनिश्चिततेची चर्चा

महापौर निवडणूक; अनिश्चिततेची चर्चा


औरंगाबाद : शिवसेना-भाजपा युतीतील करारानुसार महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आॅक्टोबर अखेरीस विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांचा कार्यकाळ संपतो आहे. युतीमध्ये राज्यभर अंतर्गत सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे महापौर तुपे हे राजीनामा देतात की नाही. याकडे सर्वांचे लक्ष असून भाजपातील इच्छुक उमेदवारांनी मात्र जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
युतीतील करारानुसार सुरुवातीच्या अडीच वर्षांपैकी दीड वर्ष शिवसेनेकडे आणि १ वर्ष भाजपाकडे महापौरपद देण्याचे ठरले.
महापौर तुपे खुल्या प्रवर्गाचे आहेत. सुरुवातीचे अडीच वर्षे त्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. दुसरीकडे भाजपातूनही १ वर्षासाठी खुल्या प्रवर्गातून महापौर उमेदवार द्यावा, अशी मागणी आहे; परंतु भाजपाकडे खुल्या प्रवर्गातून सध्या स्ट्राँग, अनुभवी उमेदवार नाही. त्यामुळे भाजपात राजू शिंदे आणि भगवान घडामोडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

या दोघांपैकी लॉबिंग करणाऱ्याची लॉटरी लागणार हे निश्चित आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत येथील महापौर, उपमहापौरपदावरून वाद होईल, असे राजकारण दोन्ही पक्षांकडून होण्याची शक्यता नसल्याने राजीनामा देण्याबाबत आदेश येऊ शकतात. या दोन्ही पदांसाठी निवडणुका होतील, असे सेना-भाजप पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
सेनेचा महापौर असताना भाजपाचा उपमहापौर आणि भाजपाचा महापौर असताना सेनेचा उपमहापौर असेल. पुढील एक वर्षे भाजपचा महापौर असेल. पाच वर्षांत दोन सभापती भाजपचे असतील, असा युती करार एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीत ठरलेला आहे. त्यानुसार तुपे आणि राठोड यांना राजीनामा द्यावा लागेल. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याबाबत अजून पक्षाने काहीही आदेश दिलेले नाहीत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे नेमके काय होणार हे सांगणे अवघड आहे.
महापौर तुपे यांना राजीनामा सभेत आयुक्तांकडे सादर करावा लागेल. या महिन्याची सभा गुरुवारी झाली. दिवाळीनंतर पुढच्या महिन्यात सभा होऊन राजीनामा दिल्यास १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान निवडणुका होणे अपेक्षित आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार राजीनामा द्यायचा म्हटल्यास विशेष सभा पुढच्या आठवड्यातच घ्यावी लागेल; परंतु महापौर राजीनामा देतील, अशी शक्यता सध्या नाही.

Web Title: Mayor election; Discussion of uncertainty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.