‘माऊलीची माया होता माझा भीमराया...!’
By Admin | Updated: April 13, 2015 00:49 IST2015-04-13T00:29:38+5:302015-04-13T00:49:17+5:30
बीड : चांदण्याची छाया, कापराची काया.. माऊलीची माया होता, माझा भीमराया...! यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगिते

‘माऊलीची माया होता माझा भीमराया...!’
बीड : चांदण्याची छाया,
कापराची काया..
माऊलीची माया होता,
माझा भीमराया...!
यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगिते बीडकरांच्या भेटीला संगिताचा साज लेऊन रविवारी आली होती. निमित्त होते जयभीम महोत्सवातील भीमगित गायन स्पर्धेचे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने ‘जयभीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील गायकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढविली.
उद्घाटनप्रसंगी प्रा.प्रदीप रोडे, मनीषा तोकले, अशोक तांगडे, नायब तहसीलदार प्रभाकर खिल्लारे, नगरसेवक गणेश वाघमारे, पोलीस उपअधीक्षक उत्तम चक्रे, तत्वशिल कांबळे यांची उपस्थिती होती.
मनीषा तोकले यांनी ‘तोडा मला अथवा जाळा, मी जय भीम नाही सोडणार’ हे गीत गाऊन स्पर्धेला सुरूवात केली. त्यांनतर भीमस्तवन झाले. प्रिया आठवले या अंध गायिकेने ‘माझ्या भिमाची पुण्याई..’ हे गीत गाऊन बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला तर सोनाली कांबळे, अर्चना दळवी, दीपाली दळवी, अजय सवाई, सुरेश रंजळे, तनिष्का गडगे, प्रिया सोनवणे, विनोद सवाई, आकाश जाधव, आकांक्षा आहिरे, राजनंदिनी समुद्रे, वंदना वाघमारे आदी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
ज्याचा रूबाब राजेशाही,
सुटा-बुटात रोजच राही..
ज्याचा जगात गाजा-वाजा,
भिमराव एकच राजा...!
हे गीत वंदना वाघमारे यांनी गायले, आणि पे्रक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. (प्रतिनिधी)