धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक पाऊस

By Admin | Updated: July 10, 2014 00:45 IST2014-07-10T00:23:25+5:302014-07-10T00:45:12+5:30

नांदेड : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ८ जुलैच्या सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, पांडुरंग विठोबा पावला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

Maximum rain in Dharmabad taluka | धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक पाऊस

धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक पाऊस

नांदेड : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ८ जुलैच्या सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, पांडुरंग विठोबा पावला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. ९ जुलैच्या सकाळी ६ वाजेपर्यंत धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक तर हिमायतनगर तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेतकरी कामाला लागला आहे.
मागील दीड महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड घालमेल वाढली होती. सुरुवातीला आलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी होईल, त्या प्रमाणात पेरण्या उरकल्या, नंतर पावसाने जी दडी मारली, ती ८ जुलैच्या सायंकाळपर्यंत. पाऊस आज येईल, उद्या येईल, या भरवशावर भोळा शेतकरी विसंबून होता, त्यासाठी त्याला मंगळवार सायंकाळपर्यंत वाट पाहावी लागली.
भोकर तालुक्यात कुठे साधारण तर कुठे चांगला पाऊस
भोकर : तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून कुठे साधारण तर कुठे चांगला पाऊस झाला़ या पावसाने शेतकरी पेरणीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली असली तरी किनी परिसरात मात्र दुबार पेरणीसाठी शेतकरी संकटात आहे़
शासनाकडून मदत हवी
ज्या परिसरात १९ जूनच्या पावसाने पेरणी झाली, तेथे आता दुबार पेरणी करावी लागत आहे़ अशा दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी २५ हजार रुपये मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे नारायण सोळंके, गंगाधर महादावाड, सुनील चव्हाण, सुभाष नाईक आदींनी केली आहे़ (वार्ताहर)
हदगाव तालुक्यात पावसाने चैतन्य
हदगाव : तालुक्यात एक महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेतन ८ जुलै रोजी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली़ त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून खोळंबलेल्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली असून परिचरात चैतन्य पसरले आहे़
दिवसभर पावसाची चिंता, भजन-कीर्तन, भंडारे करणारे शेतकरी सकाळीच शेतामध्ये दिसू लागले़ १० वाजता संपूर्ण गाव रिकामा झाला़ कापूस, मूग-उडीद, सोयाबीन आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात दिसू लागली़ अनेक दिवसांपासून मेटाकुटीला आलेल्या मजूर वर्गाला पावसामुळे भाव आला़ प्रत्येकाच्या दारात शेतकरी सरकी लावायला येता का? म्हणून मजुराला विचारू लागला़ आता आपल्याला काम मिळणार व कामाचा मोबदलाही मिळेल.
कृषी केंद्र, वाहनचालक, लघुउद्योग, कापडविक्रेता, छत्री विक्रेता यांनी सकाळीच दुकानाबाहेर सामानाची जुळवाजुळव सुरू केली़ ग्रामीण भागात मेनकापडाला जास्त मागणी असते़ घरावर झाकण्यासाठी जनावरांच्या गोठ्यावर झाकण्यासाठी शेतकरी याची खरेदी करतो़ महिन्यापासून खरेदी केलेला माल धुळखात पडला होता़ तो आता विक्री होणार अश्ी चर्चा दुकानमालक आपआपसात करू लागले़
गतवर्षी जून-जुलै महिन्यात १५५ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद झाली होती़ अनेक ओढ्या-नाल्यांना पूर येवून गेला होता़ परंतु यावर्षी पेरणीयोग्य पाऊस पहिल्यांदा झाला़ काही शेतकऱ्यांनी काळ्या पाण्यावर लावलेल्या कापसाच्या बॅगेला या पावसाने जीवनदान दिले़ बाजारपेठेत, शाळेत दिसणारा शुकशुकाट आज बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून रचेलचेल, खरेदी-विक्री सुरू झाल्याचे चित्र आहे़ हदगाव तालुक्यातील हदगाव, तामसा, निवघा या तिन्ही मंडळात चांगला पाऊस झाला़ मनाठा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प असलेतरी खोळंबलेल्या पेरण्या सुरू झाल्या़(वार्ताहर)
किनवट तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
किनवट : तालुक्यात पावसाची दडी अजूनही कायमच आहे़ ८ जुलै रोजी मांडवी, दहेली, इस्लापूर, जलधरा व शिवणी भागात हलक्याशा सरी बरसल्या़ पण हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याने दुबार पेरणीचे संकट तालुक्यावर कायमच आहे़ किनवट व बोधडी भागात तर पावसाचा थेंबही नाही़ असे असताना तालुक्यात पावसाची ८ मि़ मी़ इतकी नोंद झाल्याची माहिती आहे़
८ जुलै रोजी काही भागात पाऊस बरसल्याचे वृत्त असले तरी किनवट या डोंगराळ तालुक्यात ८ रोजी झालेल्या पावसाची नोंद सरासरी ८ मि़ मी़ इतकी झाली़ किनवट, बोधडी येथे पर्जन्यमानाची नोंद ८ रोजी निरंक आहे़ तर मांडवी ४० मि़ मी़, दहेली ११, इस्लापूर ३, जलधरा २, शिवणी १ अशी पावसाची नोंद झाली़आजपर्यंत एकूण पाऊस केवळ ५४ मि़मी़ झाला गतवर्षी ही नोंद ९ जुलैपर्यंत ४८ मि़मी़ इतकी होती़ जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली़ सध्या तरी कोरड्या दुष्काळाचे सावट तालुक्यावर कायम आहे़ (वार्ताहर)
जिल्ह्यात सरासरी २४ मि.मी पाऊस
नांदेड: जिल्ह्यात बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासात सरासरी २४.१५ मि.मी. पाऊस झाला. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी अशी- मुखेड-१७.१५ मि.मी, बिलोली- ८.४, नायगाव- ३९.००, धर्माबाद- ७८, हिमायतनगर- ४.६७, देगलूर- २४.६७, हदगाव- ५.५७, माहूर- १८.५, किनवट- ८.१५, लोहा-३१.१७, कंधार-१४.१७, उमरी- २१.००, अर्धापूर- १९.००, मुदखेड- २८.६७ व नांदेड ४१.०० मि.मी.

Web Title: Maximum rain in Dharmabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.