मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका औरंगाबादेत तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 20:21 IST2017-07-28T20:19:00+5:302017-07-28T20:21:42+5:30
मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका औरंगाबादेत तपासणार
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे. यानुसार मुंबई विद्यापीठ विधि अभ्यासक्रमांच्या ५ हजार उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत. त्या उत्तरपत्रिका औरंगाबादेतुन तात्काळ तपासून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला. मात्र या प्रयोगामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल राज्यपालांनी घेत ३१ जुलैपर्यंत सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल लावण्याचे आदेश कुलगुरूंना दिले.
यातच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉ. देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. राज्याच्या विधीमंडळातही हा प्रश्न गाजत आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपर्यंत निकाल लावणे मुंबई विद्यापीठाला अनिवार्य बनले आहे. यासाठीच मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठाकडे मदत मागितली आहे.
सुरुवातीला नागपुरच्या विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुंबईच्या अधिका-यांनी धाव घेत विधि शाखेच्या ५ हजार उत्तरपत्रिका तपासून देण्याची विनंती केली. या विनंतीनुसार विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विधि शाखेच्या १०० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाकडे पाठवली. तसेच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मुख्य ग्रंथालयातील संगणक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यास विद्यापीठातील परीक्षा विभागातील अधिका-यांनी दुजोरा दिला आहे.