नवविवाहितेचा विनयभंग बाबाविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 30, 2014 01:05 IST2014-06-30T00:51:51+5:302014-06-30T01:05:28+5:30
औरंगाबाद : आपल्याशी पत्नी नीट वागत नाही, अशी तक्रार पतीची आल्यानंतर बाबाने तिला सादातनगर येथील दर्ग्याजवळील घरात बोलावले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने केला.

नवविवाहितेचा विनयभंग बाबाविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : आपल्याशी पत्नी नीट वागत नाही, अशी तक्रार पतीची आल्यानंतर बाबाने तिला सादातनगर येथील दर्ग्याजवळील घरात बोलावले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने केला. या घटनेविषयी पतीसह सासरच्या मंडळीकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी तिला पुन्हा त्या बाबाकडे राहण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी बाबासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपींना शनिवारी रात्री अटक करण्यात आली.
अब्दुल बाबा (६०), पीडितेचा पती जिशान (२५), दर्ग्यात राहणारी समिना (५५), सासू फातेमा (४७),सर्व रा. सादातनगर यांना अटक करण्यात आली. अब्दुल बाबा हा सादातनगर येथील दर्ग्याजवळील घरात राहतो. तेथे समिनाही राहते. सादातनगर दर्गा येथे पीडित तरुणीचे वडील नियमितपणे जातात. त्यामुळे अब्दुल बाबांशी त्यांची ओळख होती. बाबाच्या सांगण्यावरून प्लंबरचे काम करणाऱ्या जिशानसोबत तिचे लग्न जुळवले आणि १६ मे रोजी लग्न झालेही. बाबा काही दिवस अमदाबाद येथे राहतो. लग्नानंतर काही दिवसांनी जिशानने बाबाला फोन करून त्याची पत्नी त्याच्याशी चांगली वागत नसल्याचे सांगितले. तेव्हा बाबाने तिला माझ्या घरी आणून सोड, असे सांगितले. पती आणि सासूने तिला बाबाकडे आणून सोडले. तेथे सुमारे १५ ते २० दिवस ती राहिली. या काळात बाबाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पती आणि सासूकडे पीडितेने तक्रार करूनही त्यांनी बाबाकडेच राहण्याचा सल्ला तिला दिला. तिने माहेरी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे तक्रार दिली. महिला दक्षता पथकाच्या सदस्यासमोर तिने जबाब दिला. नंतर हे प्रकरण सातारा पोलीस ठाण्याकडे पाठवून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.