रडगाणे ‘मातोश्री’ वर

By Admin | Updated: September 6, 2014 00:43 IST2014-09-06T00:39:45+5:302014-09-06T00:43:03+5:30

औरंगाबाद : खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी महापौर कला ओझा यांना कार्यक्रमाला उशिरा येण्याच्या कारणावरून झापल्यामुळे त्यांना रडू आले.

On 'Matoshree' | रडगाणे ‘मातोश्री’ वर

रडगाणे ‘मातोश्री’ वर

औरंगाबाद : खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी महापौर कला ओझा यांना कार्यक्रमाला उशिरा येण्याच्या कारणावरून झापल्यामुळे त्यांना रडू आले. ते रडगाणे मातोश्रीवर पोहोचविण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, यासाठी ही सगळी उठाठेव करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापौरांचा अपमान झाल्यामुळे महिला वर्गातून त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एन-८ येथील कार्यक्रमात खा.खैरे महापौरांना उद्देशून म्हणाले होते, शिवसेनाप्रमुखांचे नाव उद्यानासाठी द्यायचे आहे. त्या कार्यक्रमाला पदाधिकारी उशिरा येतात. खुलासा करताना आज महापौर म्हणाल्या, याप्रकरणी मी कुणाकडेही कुणाचीही तक्रार केलेली नाही. मला गुरुवारी एन-८ येथील कार्यक्रमाला उशीर होण्यामागे महालक्ष्मी सणाचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता. त्यामुळे उशीर झाला. घरी महिला आल्यानंतर थांबावे तर लागणारच. कार्यक्रमाला इतर नेते व पदाधिकाऱ्यांना बोलाविले होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत. शिवसेनाप्रमुख श्वास असेपर्यंत माझ्यासाठी आदर्श राहतील. एन-८ उद्यानाला त्यांचे नाव देण्याचा ठराव मीच पारित केला होता. आजवर पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहिलेले आहे. यापुढेही राहणार आहे. माझ्यासाठी संघटना मोठी आहे. संघटना आहे म्हणून मी आहे. बाळासाहेबांमुळेच सत्ता आणि लाल दिवा मिळाला आहे, याची जाणीव मला आहे.
संपर्क नेते म्हणाले...
सेना संपर्क नेते आ. विनोद घोसाळकर म्हणाले, मी आज स्थानिक पदाधिकाऱ्यांंशी वेगळ्या विषयावर बोललो. या प्रकरणाची कुठलीही माहिती माझ्याकडे आलेली नाही. माहिती आल्यानंतर याचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी करील.
मी काय चूक केली? कला ओझा यांचा सवाल
मला वाटत नाही मी काही चूक केली आहे. १५०० कोटी रुपयांच्या योजना माझ्या कार्यकाळात सुरू झाल्या आहेत. तसेच प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात कामे सुरू आहेत. कुठलाही स्वार्थ न ठेवता ही कामे केली. हे सर्व काही करीत असताना वारंवार मन दुखावले जाणे हे योग्य वाटत नाही, असे महापौर ओझा म्हणाल्या. पथदिव्यांच्या ११२ कोटींच्या कंत्राटामुळे ही झापाझापी झाली काय, यावर महापौर म्हणाल्या, तो निर्णय स्थायी समितीचा आहे. तसेच ऐनवेळी आलेला तो विषय होता. माझ्याकडे त्याची प्रतही आलेली नव्हती. प्रत्येकाला आपापली जबाबदारी विभागून दिली आहे. सभापती आमच्याच पक्षाचे असून, आम्ही सर्व एक आहोत.

Web Title: On 'Matoshree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.