मनपातील बळावर मतांचे गणित
By Admin | Updated: October 6, 2014 00:43 IST2014-10-06T00:24:10+5:302014-10-06T00:43:12+5:30
विकास राऊत, औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे व इतर सर्व पक्ष मैदानात उतरले असून, सर्वांची ताकद महापालिकेतील पक्षीय बलाबलावरच आधारित आहे.

मनपातील बळावर मतांचे गणित
विकास राऊत, औरंगाबाद
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे व इतर सर्व पक्ष मैदानात उतरले असून, सर्वांची ताकद महापालिकेतील पक्षीय बलाबलावरच आधारित आहे.
शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदारसंघांत पालिकेचे ९९ वॉर्ड विभागले गेले आहेत. मतदारसंघ विभाजनामुळे मनपात सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपाची ताकद विभागली गेली आहे.
दोन्ही पक्षांचे ४५ नगरसेवक चारही मतदारसंघांत विभागले गेल्यामुळे भाजपाला मोठा फटका बसला आहे. त्या तुलनेत काँग्रेस नगरसेवकांचे सर्वाधिक संख्याबळ हे पूर्व मतदारसंघात आहे.
पश्चिम आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत. त्याखालोखाल पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ चार मतदारसंघांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच आहे. त्यातील काही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामे दिले आहेत. तर मनसेचा एक नगरसेवक पालिकेत असून, तोही मध्य मतदारसंघात आहे. शिवसेना-भाजपाकडे ५६ नगरसेवकांचे संख्याबळ असले तरी महायुतीचा घटस्फोट झाल्यामुळे तो गट फुटला आहे. काँग्रेसकडे ३१ नगरसेवकांचा गट कायम आहे. राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांमध्येही फूट पडली आहे. तर भाजपाचे १५ नगरसेवक चार मतदारसंघांमध्ये विभागल्याने कुणाचाही कुणाला मेळ राहिलेला नाही.
काँग्रेसचा गड पूर्व मतदारसंघ
पूर्व मतदारसंघ हा पूर्णत: शहर मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मनपाचे सर्व मिळून ३४ वॉर्ड येतात. त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेसचे १३ नगरसेवक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त ४ तर भाजपाचे ५ नगरसेवक आहेत. काँग्रेसनंतर विचार केला तर शिवसेनेचे ९ तर अपक्ष ३ नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघाने ३३६४ मतांची आघाडी दिली होती.
‘मध्य’ मध्ये शिवसेनेला बळ
‘मध्य’मतदारसंघात शिवसेनेला सर्वाधिक बळ आहे. शिवसेनेचे दहा नगरसेवक त्या मतदारसंघात आहेत. तर १३ अपक्षांपैकी काही काँगे्रसच्या सोबत आहेत. काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस ३, भाजपाचे ३ आणि शहर प्रगती आघाडीचे ३ नगरसेवक त्या मतदारसंघात आहेत. हा मतदारसंघ शहरातील जुन्या वॉर्डांतून तयार झालेला आहे. ऐतिहासिक वास्तूंचा हा मतदारसंघ आहे. सेनेला बळ असतानाही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला १९४६ मतांची आघाडी होती.
‘पश्चिम’मध्ये शिवसेनेची ताकद
पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक १० नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षाला तेथून मोठ्या प्रमाणात ताकद मिळालेली
आहे. काँग्रेसचे २, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि भाजपाचे फक्त ३ नगरसेवक त्या मतदारसंघामध्ये आहेत. अपक्ष ५ नगरसेवक त्या मतदारसंघात असून, काही जण सेनेसोबत होते. मात्र, त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. लोकसभा निवडणुकीत सेनेला या मतदारसंघातून ३५ हजार ८२८ मतांची आघाडी होती.