पंचायत समिती आरक्षणाने गणिते बदलली
By Admin | Updated: June 28, 2014 01:19 IST2014-06-28T01:01:36+5:302014-06-28T01:19:39+5:30
जिल्ह्यातील पंचायत समितींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जाहीर झाली आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणची राजकीय गणिते बदलली.

पंचायत समिती आरक्षणाने गणिते बदलली
जिल्ह्यातील पंचायत समितींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जाहीर झाली आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणची राजकीय गणिते बदलली. या आरक्षणाने कुणाच्या पारड्यात भरभरून टाकले, तर काहींच्या पारड्यातील हिसकावूनही घेतले. त्यामुळे काही ठिकाणी ‘आसू’, तर काही ठिकाणी ‘हसू’ असे चित्र होते.
सिल्लोडमध्ये महिलाराजच
सिल्लोड पंचायत समितीचे सभापतीपद एकाच पंचवार्षिक निवडणुकीत दुसऱ्यांदा महिलेसाठी राखीव झाले आहे. यापूर्वी एस.सी. महिला राखीव होते. अडीच वर्षांनंतरच्या दुसऱ्या टर्मसाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये ओपन महिलेसाठी राखीव झाला आहे. सिल्लोड पंचायत समिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ६, भाजपाचे ६, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ असे पक्षीय बलाबल आहे.
सभापती रेखा जगताप यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. अल्पसंख्यकांना प्राधान्य दिल्यास काँग्रेसकडून अजिंठा गणातील डॉ. शिरीन शेख यांची वर्णी लागू शक ते. राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपद दिले, तर हट्टी गणातील माधवी कळात्रे यांच्या नावाचा विचार होईल. भाजपाकडून बोरगाव सारवणी गणाच्या वृषाली मिरकर व उंडणगाव गणाच्या लताबाई लांडगे या दोन सदस्यांची नावे अग्रेसर राहतील. गेल्या निवडणुकीत काँगे्रसचे ७, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे आघाडीचे ९ पंचायत समिती सदस्य होते. यानंतर काँग्रेसकडून निवडून आलेले ठगन भागवत व अंधारी गणातून अपक्ष निवडून आलेल्या लताबाई वानखेडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ४ झाले. ठगन भागवत यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढण्यात आलेले आहे, तर लताबाई वानखेडे गेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार होत्या. ठगन भागवत व लताबाई वानखेडे यांनी वेळेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जात भाजपाशी हातमिळवणी केली, तर आघाडी व युतीचे समान ८-८ असे सदस्य राहतील.
सभापतीपदासाठी काँग्रेसकडून पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री अब्दुल सत्तार व जि.प.चे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांचा निर्णय अंतिम राहील. भाजपाचा उमेदवार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून ठरवला जाणार आहे.
सोयगावात काँग्रेसच
पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झालेले आहे. काँग्रेसकडे तीन महिला सदस्य आहेत, तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे महिला नसल्यामुळे पहिली अडीच वर्षे सभापतीपद असणाऱ्या काँग्रेस पक्षाचाच सभापती दुसऱ्या टप्प्यातही राहणार, हे निश्चित झाले आहे.
सोयगाव पंचायत समितीचे सहा गण आहेत. यात सोयगाव, बनोटी आणि सावळदबारा गणातून महिला सदस्या निवडून आलेल्या आहेत, तर निंबायती, गोंदेगाव व फर्दापूर येथे पुरुष सदस्य निवडून आले आहेत. इतर मागासवर्गीय महिलांसाठी सभापतीपद राखीव असल्याने सोयगाव गणातून निवडून आलेल्या नंदाताई आगे सभापती झाल्या. आता अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलेकरिता सभापतीपद राखीव झाले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
सभापती होणार काँग्रेसचाच
काँग्रेसकडे तीन महिला आहेत, तर इतर पक्षांकडे एकही महिला नाही. त्यामुळे पुन्हा सभापती काँग्रेसचाच होणार, हे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे पहिल्या वेळेस बिनविरोध निवड झाली आहे. यावेळीदेखील बिनविरोध निवड होणार आहे. काँग्रेसकडून विद्यमान सभापती नंदाताई आगे, कमलाबाई शेळके व हमिदाबी सांडू तडवी या तीन महिलांपैकी कुणाच्या गळ्यात माळ पडणार? मंत्री अब्दुल सत्तार कुणाला संधी देणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पैठणला मनसेचे इंजिन
पैठण पंचायत समितीच्या सभापतीसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत पैठण पंचायत समिती सभापतीपद हे एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. पैठण पंचायत समितीच्या १६ सदस्यांपैकी पिंपळवाडी गणातील मनसेच्या सदस्या पुष्पाबाई रामनाथ केदारे या एकमेव सदस्य या प्रवर्गातील असल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पैठण पंचायत समिती मनसेच्या ताब्यात जाणार आहे.
पैठण पंचायत समितीमध्ये सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेचे असून, त्यांचे सात सदस्य आहेत. त्यापाठोपाठ मनसेचे ४, काँग्रेसचे ३ व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. या सदस्यांपैकी मनसेच्या पुष्पाबाई केदारे या एकमेव एस.सी. प्रवर्गातील आहेत.
तालुक्यातील कातपूर ग्रामपंचायत सदस्य म्हणून पुष्पाबाई केदारे यांनी राजकारणात प्रवेश केला. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या पुष्पाबाई केदारे यांनी एका खाजगी कंपनीत नोकरी केली. दरम्यान, पिंपळवाडी गणातून पंचायत समितीची निवडणूक मनसेकडून लढून त्या विजयी झाल्या. मनसेचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.
यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणाऱ्या संधीचा ते कसा फायदा घेतील व कशी राजकीय खेळी खेळतील याकडे लक्ष लागून आहे.
गंगापूर शिवसेनेकडेच
गंगापूर पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत या पदासाठी रस्सीखेच होणार आहे.
पक्षीय बलाबला पाहता शिवसेनेचे १०, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-४, आ.बंब आघाडी ३, तर मनसेचा एक सदस्य आहे. सद्य:स्थितीला सभापतीपदी चंद्रभागा गोल्हार, तर उपसभापतीपदी पोपटराव गाडेकर विराजमान आहेत. सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात असतानादेखील मागील काही दिवसांत सभापती व उपसभापती पदांमध्ये बदल करण्यासंदर्भात शिवसेनेच्या गोटात अस्थिरता होती. काही असंतुष्टांनी अनेक वेळा बैठका घेऊन सभापतीपद बदलाचे संकेत दिले होते; मात्र वरिष्ठांनी यात वेळीच लक्ष घालून सर्वांची समजूत घातल्यामुळे बदलाचे वारे शमले होते.
गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्यांना या आरक्षणामुळे नवसंजीवनी मिळाली असून, आता आपणच सभापती होणार या तोऱ्यात वावरत आहेत. निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच करणार, अशी भावना काही सदस्यांची आहे. उपसभापती पोपटराव गाडेकर सभापतीपदाचे दावेदार असले तरी त्यांना सभापतीपद मिळू नये यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. इतर पक्षांचा विरोध नाही; परंतु शिवसेनेतच दोन गट परस्परांचे तिकीट कापण्यात गुंतले आहेत. सभापतीपद व उपसभापतीपद हे शिवसेनेलाच मिळणार, हे त्रिकालसत्य आहे. यात संजय जैस्वाल, ज्ञानेश्वर बोरकर, कृष्णा सुकासे, अनिल खवले, सुरेखा अरुण रोडगे, चंद्रकला ढवाळ, वर्षा गंडे आदींच्या नावांची चर्चा आहे.
फुलंब्रीत दोन दावेदार
फुलंब्री येथील पंचायत समिती सभापतीपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. यात राष्ट्रवादीकडे एक व शिवसेनेची एक महिला दावेदार आहे.
फुलंब्री पंचायत समितीत विद्यमान सभापती सुनीता भागवत यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यांना केवळ सव्वा वर्षे सभापतीपदाची संधी देण्यात आली. फुलंब्री पंचायत समितीत तीन काँग्रेस पक्षाचे, तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर दोन शिवसेनेचे सदस्य आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सभापतीपद आहे, तर उपसभापतीपद काँग्रेसकडे आहे. माजी सभापती माधुरी गाडेकर यांना दुसऱ्यांदा सभापतीपदाची संधी मिळू शकते. त्या सुरुवातीला सव्वा वर्षे सभापतीपदावर होत्या.
येणाऱ्या सप्टेंबरमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहिली तर माधुरी गाडेकर या सभापती पदावर विराजमान होऊ शकतात. आघाडीत बिघाडी झाली तर ती संधी शिवसेनेच्या सरोजा काळे यांना मिळू शकते. विधानसभा निवडणूक डोक्यावर आली असताना पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला महत्त्व येणार आहे. दरम्यान, आ. डॉ. कल्याण काळे, माजी जि.प. अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, डॉ. सारंग गाडेकर, संदीप बोरसे, सुदाम मते, नितीन देशमुख, अनुराधा चव्हाण आदी नेतेमंडळी काय खेळी खेळतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
खुलताबादेत पुन्हा महिला
खुलताबाद पंचायत समिती सभापतीपदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला वर्गासाठी निघाल्याने पुन्हा एका महिलेला सभापतीपद मिळणार असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पुरुष सभापतीपदावर विराजमान झाला नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
खुलताबाद पंचायत समिती सभागृहात सहा पं.स. सदस्य असून, काँग्रेस-३, शिवसेना-२, आ. प्रशांत बंब गट-१ असे पक्षीय बलाबल आहे. सभापतीपदी काँग्रेसच्या लीलाबाई साहेबराव पवार, तर उपसभापतीपदी आ. प्रशांत बंब गटाचे दिनेश अंभोरे विराजमान आहेत. महिला ओबीसीसाठी गेल्या वेळी सभापतीपद राखीव होते.
आता पुन्हा महिला सर्वसाधारणसाठी सभापतीपदाचे आरक्षण निघाल्याने काँग्रेसच्या फरजाना मझहर पटेल, शिवसेनेच्या कुसुमबाई प्रकाश मिसाळ या दावेदार आहेत. सभापतीपद मिळविण्यासाठी यावेळी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जाणार असले तरी काँग्रेस व आ. प्रशांत बंब गटात पुन्हा जुनाच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.
गेल्या टर्ममध्येही आशाताई नलावडे व ताराबाई कुकलारे या महिला सभापती होत्या. आता लीलाबाई पवार या सभापतीपदी आहेत. आरक्षण निघाल्याने महिलाच सभापतीपदावर विराजमान होणार आहे. त्या दृष्टीने तालुक्यात हालचाली सुरू झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मिळाले प्रमोशन
कन्नड पंचायत समितीचे सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचे निघाल्याने कोळवाडी गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेमा धर्मू मधे हे पंचायत समितीचे सभापती होणार आहेत.
कोळवाडी गण हा जेहूर जिल्हा परिषद गटात आहे. खेमा मधे हे ठाकर समाजातील आहेत. पं.स.च्या १८ सदस्यांपैकी ते एकमेव अनुसूचित जमातीचे सदस्य आहेत. ते अशिक्षित असून भूमिहीन आहेत. आता तुम्ही पंचायत समितीचे सभापती होणार आहात? तुम्हाला काय वाटते? या प्रश्नावर बोलताना, ही भगवंताची कृपा. आपण इथपर्यंत जाऊ, असे कधीही वाटले नाही. दोस्त मंडळींच्या सहकार्याने निवडून आलो. आता भगवंताची कृपा आणि आई-वडिलांच्या पुण्याईने, तसेच मित्रमंडळींच्या शुभेच्छांमुळे सभापतीपद मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मनसेकडे सध्या उपसभापतीपद आहे. आता मात्र मनसेला नशिबाने साथ दिली आणि सभापतीपदाची खुर्ची मिळाली. इलेक्शनच्या तोंडावर प्रमोशन मिळाल्याने मनसे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
कोळवाडी या गावात जल्लोष करण्यात आला. माजी उपसभापती गीताराम पवार यांच्यासह परिसरातून जमलेले समाजबांधव, कार्यकर्ते, मित्रमंडळी, ग्रामस्थ जल्लोषात सहभागी झाले होते.
वैजापुरात तिघांना संधी
वैजापूर पंचायत समितीचे सभापतीपद आज आरक्षण सोडतीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले. पंचायत समितीमध्ये इतर मागास प्रवर्गातील चार सदस्य आहेत. पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सेनेच्या छाया बोरनारे वगळता राष्ट्रवादीचे शिवाजी अधुडे, वाल्मीक बोढरे व द्वारका पवार हे तीन सदस्य सभापतीपदाचे दावेदार आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून पंचायत समिती सेनेच्या ताब्यात होती. सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सेनेच्या ताब्यातून हिसकावून राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले. राष्ट्रवादीला ९, सेना ३ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या. सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असून, सभापती व उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सभापतीपद आरक्षित होते. आता जवळपास अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला. नवीन आरक्षण सोडतीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सभापतीपद पुढील अडीच वर्षांसाठी राहील.
विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सभापतीपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाल्मीक बोढरे, शिवाजी आधुडे व द्वारका पवार हे तीन जण सभापतीपदासाठी दावेदार होऊ शकतात. सेनेच्या बोरनारे या जरी मागास प्रवर्गातील असल्या तरी मात्र सेनेकडे बहुमत नसल्याने त्यांना संधी मिळणे शक्य नाही. त्यामुळे या त्रिकुटांपैकी सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हा सध्या तरी तालुकावासीयांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. याशिवाय धाकटे चिकटगावकर कोणावर ‘मेहरबान’ होतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, वैजापूर पंचायत समितीत नेहमीच राजकारणाने रंग घेतलेला आहे. येणाऱ्या सभापतीपदासाठी ‘टॉप टू बॉटम’ पुढाऱ्यांकडून राजकीय हालचालींना वेग येणार आहे.