मोबाईलच्या प्रकाशात प्रसुती
By Admin | Updated: July 23, 2014 00:33 IST2014-07-23T00:14:11+5:302014-07-23T00:33:42+5:30
तामलवाडी : बंद वीजपुरवठ्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करीत मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात महिलेचे बाळंतपण केले.

मोबाईलच्या प्रकाशात प्रसुती
तामलवाडी : बंद वीजपुरवठ्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करीत मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात महिलेचे बाळंतपण केले. सदर महिलेने मंगळवारी पहाटे कन्यारत्नाला जन्म दिला. डॉक्टरांच्या तत्परतेमुळेच सुरक्षितरित्या प्रसुती होवू शकली, अशी प्रतिक्रीया वृंदावनी यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
सोमवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे अचानक विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. अशात सावरगाव येथील वृंदावनी अविनाश पवार (२०) या महिलेस मध्यरात्री प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथील कर्मचाऱ्यांनी डॉ. एस. जी. मोरे यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. डॉक्टरही दवाखान्यामध्ये हजर झाले. अख्ख्या दवाखान्यात अंधार होता. काय करावे, हे कुणालाच कळत नव्हते. शेवटी कर्मचाऱ्यांनी जुनाट इमारतीतील सामान हटवून प्रसूतीसाठी जागा उपलब्ध केली. कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या तात्पुरत्या स्वरुपाच्या प्रसूतीगृहात डॉ. मोरे यांच्यासह आरोग्य सेविका एस. जे. उकिरडे, जे. बी. काळे या कर्मचाऱ्यांनी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात पहाटेच्या सुमारास वृंदावनीची तपासणी केली. यावेळी सदरील महिलेचा रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. पहाटेच्या सुमारास वृंदावनीने कन्येला जन्म दिला.
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे बाळ व बाळंत सुखरुप असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. (वार्ताहर)