रुग्णवाहिकेतच प्रसूती
By Admin | Updated: July 22, 2014 00:37 IST2014-07-22T00:22:49+5:302014-07-22T00:37:10+5:30
कन्नड : रुग्णवाहिकेतच महिला प्रसूत झाल्याने आरोग्य विभागाच्या जननी शिशु सुरक्षा योजनेचे ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारीच कसे तीनतेरा वाजवीत आहेत याचे उदाहरण सोमवारी पाहावयास मिळाले.

रुग्णवाहिकेतच प्रसूती
कन्नड : रुग्णवाहिकेतच महिला प्रसूत झाल्याने आरोग्य विभागाच्या जननी शिशु सुरक्षा योजनेचे ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारीच कसे तीनतेरा वाजवीत आहेत याचे उदाहरण सोमवारी पाहावयास मिळाले.
घुसूरतांडा येथील महिलेला प्रसूतीसाठी चिकलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सकाळी १० वा. प्रा.आ. केंद्रात आणण्यात आले. तथापि, या ठिकाणी एकही कर्मचारी हजर नव्हता. रुग्णवाहिका चालकाने वैद्यकीय अधिकारी यांना ही गोष्ट भ्रमणध्वनीवर सांगितली. त्यावर संबंधित महिलेस बहिरगाव आरोग्य उपकेंद्रात नेण्याची सूचना मिळाल्याने त्या महिलेला घेऊन रुग्णवाहिका बहिरगावकडे निघाली असता वाटेतच महिला जीपमध्येच प्रसूत झाली. तिने पुरुष जातीच्या बाळाला जन्म दिला. ही गोष्ट बहिरगाव येथील आरोग्य सहायिकेला समजली. तिने तात्काळ येऊन जीप चिकलठाण येथील प्रा.आ. केंद्रात आणली व रुग्णास आरोग्य केंद्रात ठेवले.
दरम्यान, ही घटना कळल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विडेकर यांनी प्रा. आ. केंद्रास भेट दिली. विशेष म्हणजे सकाळी साडेअकरा वाजता भेट दिली. त्यावेळी तेथे वाहनचालक आणि बहिरगाव उपकेंद्राची आरोग्यसहायिका यांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. आठवड्याची सुटी असल्याने वैद्यकीय अधिकारी आल्याच नव्हत्या. तथापि, एकही कर्मचारी या ठिकाणी आढळून आला नाही, अशी नोंद व्हिजिट बुकवर करून डॉ. विडेकर परतले. रविवारी रात्री आरोग्य केंद्रात कुणाची ड्यूटी होती? सोमवारी सकाळी कुणाची ड्यूटी होती? याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)