माता मृत्यूचे प्रमाण घटले

By Admin | Updated: July 10, 2014 00:42 IST2014-07-10T00:05:57+5:302014-07-10T00:42:37+5:30

विलास चव्हाण, परभणी जननी शिशु सुरक्षा योजनेतंर्गत ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातेच्या तपासण्या, रक्त पुरवठा, औषध, आहार व वाहन सेवा मोफत दिल्या जात आहे़

Maternal mortality decreased | माता मृत्यूचे प्रमाण घटले

माता मृत्यूचे प्रमाण घटले

विलास चव्हाण, परभणी
जननी शिशु सुरक्षा योजनेतंर्गत ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातेच्या तपासण्या, रक्त पुरवठा, औषध, आहार व वाहन सेवा मोफत दिल्या जात आहे़ जिल्हयात वर्षभरात केवळ ८ मातांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून माता मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे़
राज्यात माता-बालक-अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यत उपाययोजन करण्यात आल्या आहेत़ यासाठी ग्रामीण भागात आशा, प्रशिक्षित दाया या गरोदर मातांनी कोणता आहार घ्यावयाचा, गरोदर काळात स्वत:ची कशी काळजी घ्यायची याची माहिती देतात़ तसेच अति जोखमीच्या मातेला प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले जाते़ त्यामुळे जिल्ह्यातील माता-बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे़
दर हजारी ९९० बालिकेची संख्या झाली आहे़ शासकीय रुग्णालयात मोफत प्रसूती केली जात आहे़ परंतु, खाजगी रुग्णालयात नॉर्मल प्रसुतीचे प्रमाण बोटावर मोजण्याऐवढच होतात़ त्याऐवजी सिझरचे प्रमाण वाढले आहे़ या सिझरसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून ३० ते ४० हजार रुपये ऐवढा खर्च येत आहे़ याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्नाराजी व्यक्त होत आहे़
आवश्यकताच असल्यासच डॉक्टरांनी सिझर करणे गरजेचे आहे़ परंतु, पैशाच्या लोभापायी नको असतानाही सिझर केले जात आहे़ यामध्ये हजारो रुपयांची कमाई डॉक्टर करीत आहेत़ याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़
बुधवारी जिल्हा रुग्णालयात सात बालकांना दिला जन्म
परभणी जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण दर हजारी १़२ टक्के एवढे आहे़ काही वर्षापूर्वी माता मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते़ परंतु, दळणवळणाची व्यवस्था झाल्याने माता व बालकांच्या मृत्यू प्रमाणात घट झाली आहे़
लोकसंख्येच्या मानाने जिल्ह्यात रुग्णालयांची संख्या जेवढी असायला हवी तेवढी नाही़ त्यामुळे रुग्णांना अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील रुग्णालयात यावे लागते़ त्याऐवजी ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे़
जिल्हा रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री १२ ते दुपारी ४ या वेळेत सात बालकांना मातांनी जन्म दिला़ यामध्ये चार मुली व ३ मुलांचा समावेश आहे़, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील प्रसुतीगृहाचे अधीक्षक डॉ़ कनकुटे यांनी दिली़
जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागातील आढावा
एकूण प्रसुती ८२७७
१०० कॉटची व्यवस्था
जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात़
भारतात दरहजारी माता मृत्यूचे प्रमाण २़१२ एवढे आहे़
राज्यात दरडोई माता मृत्यूचे प्रमाण १़०४ आहे़
जननी शिशु सुरक्षा योजनेतंर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील ग्रामीण भागातील मातेला ६०० रुपये, शहरी भागातील ७०० रुपयांचा लाभ दिला जातो़
प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात मातेचा गर्भपात होऊ नये म्हणून कायद्याची कठोर अंमलबजावणी केल्याने दरहजारी ९९० झाले आहे़ तसेच सर्व प्रसुती शासकीय रुग्णालयात झाली पाहिजे़ हा उद्देश आहे़ लोकांनी १०२ व १०८ या ‘टोल फ्री’ चा वापर करून रुग्णवाहिका उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ़ प्रकाश डाके यांनी केले़

Web Title: Maternal mortality decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.