गेवराईत इदगाह मैदानावर होते सामूहिक प्रार्थना

By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-12T23:59:37+5:302014-07-13T00:18:09+5:30

गेवराई : शहरात एकूण ३० च्या जवळपास मशिदी आहेत. यामध्ये दर्गा मशीद व जामा मशीद ही सर्वात पुरातन मशीद आहे.

Massive prayer at Gegravi Idgah grounds | गेवराईत इदगाह मैदानावर होते सामूहिक प्रार्थना

गेवराईत इदगाह मैदानावर होते सामूहिक प्रार्थना

गेवराई : शहरात एकूण ३० च्या जवळपास मशिदी आहेत. यामध्ये दर्गा मशीद व जामा मशीद ही सर्वात पुरातन मशीद आहे. यामुळे शहरातील बहुतांश मुस्लीम बांधव दर्गा मशीद येथे नमाज आदा करण्यासाठी जातात. याशिवाय काही भागातील मुस्लीम बांधव आपापल्या भागातील मशिदमध्ये सामुहिक प्रार्थना करतात असे येथील नागरीक अमन काझी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
रमजानचा महिना सुरू असल्याने तालुक्यातील आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात गजबजत आहेत. याशिवाय गेवराई शहरात विविध फळांचे गाडे, कपड्याची दुकाने, सुका मेवा विक्रीची धूम सुरू आहे. दिवसभर पाणीदेखील न पिता उपवास करत सायंकाळच्या वेळी सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत उपवास सोडतात. उपवास सोडताना सर्वांना बरोबर घेऊन उपवास सोडला जातो.
विशेष म्हणजे काही हिंदू धर्मातील नागरीकदेखील रमजानचा उपवास करतात. तेदेखील सायंकाळी सर्वांच्या बरोबर उपवास सोडत असल्याचे चित्र गेवराई शहरात पहावयास मिळत आहे.
दिवसभर पाणीदेखील न पिता उपवास केला जातो. सायंकाळच्या वेळी शहरातील बसस्थानक परिसरात फळांचे गाडे लावण्यात आलेले आहेत.
सायंकाळी नमाज पठण केल्यानंतर फळांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामध्ये टरबूज, केळी, डाळिंब, पपई, अंबा, पेंड खजूर खाऊन रोजा सोडला जातो. (वार्ताहर)
इन्सानियत, भाईचारा शिकविणारा रमजान महिना
मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा व पवित्र सण रमजान आहे. आज १३ वा रोजा आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा रमजान निमित्ताने गजबजू लागल्या आहेत. अजून १७ रोजे बाकी आहेत. यानिमित्ताने सगळीकडे सर्वधर्म समभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्लिम बांधवांबरोबरच हिंदू बांधव देखील रोजा करत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात विविध भागांमध्ये पहावयास मिळत आहे.
रंगरंगोटी आणि रोषणाई
शहरात एकूण ३० मशीद आहेत. मुस्लिम बांधव एकत्र येऊन अल्लाक डे सुख-शांतीसाठी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे रोजाच्या महिन्यात केलेली प्रार्थना थेट अल्लाहपर्यंत पोहोचते, अशी भावना आहे़ यामुळे शहरातील मशिदींमध्ये मुस्लिम बांधव एकत्र येत प्रार्थना करतात. रमजानच्या निमित्ताने शहरातील मशीदींना रंगरंगोटी व रोषणाई करण्याचे काम सुरू असल्याचे शनिवारी पहावयास मिळाले. २९ जुलै रोजी ईद असल्याने सर्वत्र खरेदीची लगबग सुरू आहे, असे हसन अख्तर यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.
अंबाजोगाईमध्ये ईदच्या तयारीसाठी लगबग !
अंबाजोगाई : इस्लाम धर्मात रमजान हा महिना अत्यंत पवित्र समजला जातो. संपूर्ण एक महिना हा सण विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. कडक उपवास व धर्मनिष्ठा या बरोबरच आता राष्ट्रीय एकात्मतेसाठीही धर्मातील अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अंबाजोगाईत रमजान महिना उत्साहात सुरू असून ईदच्या तयारीसाठी महिला व बांधवांची मोठी लगबग सुरू आहे.
अंबाजोगाई शहरात जवळपास ३० मशिद आहेत. रमजानच्या निमित्ताने सर्वच मशिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंगळवारपेठेतील महमंदी मशीद, गवळीपुरा येथील मर्कज मशीद, मंडीबाजारातील गढी मशीद, गुरुवारपेठेतील मदिना मशीद, नुरानी मशीद, सदर बाजारमधील मशीद अशा विविध मशिदींमध्ये दररोज सकाळ व संध्याकाळ नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रमजान ईदच्या निमित्ताने शहारतील ईदगाह मैदान, मौलवीचा पहाड व चांदमारी या परिसरातील मैदानाची स्वच्छता स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. ईदच्या निमित्ताने कपडा बाजार, भुसार व विविध वस्तूंची दुकाने शहरात थाटली आहेत.
ईदनिमित्ताने राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने इफ्तार पार्ट्यांचे आयोजन सुरू आहे. सध्या मुस्लिम बांधवांचे परस्परांकडे दररोजचे इफ्तार मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. (वार्ताहर)
परळी: शहरात रमजानच्या निमित्ताने ठिकठिकाणी सामूहिक इफ्तार कार्यक्रम होत आहेत. यामध्ये हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन रोजा साजरा करत असल्याचे परळी शहरात पहावयास मिळत आहे.
परळी शहरात एकूण २३ मशीद आहेत. ईदची नमाज शहरात दोन ठिकाणी पठण केली जाते. यामध्ये पोलिस ठाणे मैदान व मलिकपुरा भागातील ईदगाह मैदानचा समावेश आहे. इफ्तार कार्यक्रम सामूहिकरीत्या आयोजित केले जात असल्याने या कार्यक्रमात सर्व जाती-जमातीचे व धर्माचे लोक एकत्र येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)

Web Title: Massive prayer at Gegravi Idgah grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.