छत्रपती संभाजीनगर: दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर आज (मंगळवार) सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत किल्ल्याच्या परिसरातील गवत, झाडे पूर्णपणे जळून खाक झाली असून, जीवसृष्टी आणि ऐतिहासिक वारशाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
ही आग खाली काला कोटमधून सुरू झाली. वाऱ्याच्या जोरामुळे आगीने क्षणार्धात उंचावर झेप घेतली आणि बालेकिल्ल्याने चारही बाजूंनी पेट घेतला. किल्ल्यावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बारादरीच्या छतावरील जुने लाकडी तुळे व सज्जेही आगीत भस्मसात होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.
आग लागल्याचे वृत्त समजताच दौलताबाद पोलिस, भारतीय पुरातत्व विभाग आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, किल्ल्याचे उंचसखल आणि कठीण भौगोलिक रचनेमुळे अग्निशामक दलाचे बंब आगीच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. पुरातत्व विभागाकडे अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टिम नसल्याने आणि उंचावर पाणी लिफ्ट करण्याची कोणतीही सोय नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.
खांदुर्णी आणि किल्ला परिसरात लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप घेतले. सुकलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आग अधिक वेगाने पसरली. या आगीत किल्ल्यावर वास्तव्यास असलेले मोर, माकडं, लांडोर, इतर पक्षी व प्राणी घाबरून जवळील शेतांमध्ये धावताना दिसले. अनेक लहान प्राणी आणि जीवजंतू आगीत होरपळून नष्ट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अग्निशमन दलाला तात्काळ माहिती दिली गेली. मात्र, वाहनांना पोहोचण्यात अडथळे येत असल्याने स्थानिकांनी झाडांच्या फांद्या, पाण्याचे हंडे आदी साधनांचा वापर करत शर्तीचे प्रयत्न केले.
दरवर्षी उन्हाळ्यात देवगिरी किल्ल्यावर आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र, याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अशा संकटांची पुनरावृत्ती होते. इतिहास अभ्यासकांच्या मते, अशा वारंवार लागणाऱ्या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन वास्तूंना मोठा धोका निर्माण झाला आहे. शासनाने वेळेवर योग्य उपाययोजना न केल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यता आहे.