छत्रपती संभाजीनगर : माहेरहून ५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेला जाळून मारण्यात आले होते. सदर खटल्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शुक्रवारी पती वसीमखाँ रसूलखाँ पठाण, सासरा रसूलखाँ गुलाब खाँ पठाण, सासू शकीला बी रसूलखॉ पठाण व दीर इम्रान खाँ रसूलखाँ पठाण (सर्व रा. आंबेडकर चौक, सिल्लोड) यांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. २०१५ साली घडलेल्या या घटनेचा १० वर्षांनंतर निकाल लागला.
काय होती फिर्याद ?याबाबत मृत फरीन बेगम हिचे काका शेख शबाबुद्दीन हबीबुद्दीन (रा. करंजखेडा, ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फरिन बेगमचे ६ एप्रिल २०१४ रोजी सिल्लोड येथील वसीम खाँ याच्याशी लग्न झाले होते. विवाहानंतर सासरचे लोक पतीच्या नोकरीसाठी माहेरहून ५ लाख रुपय आणण्याची वारंवार मागणी करत. पैसे न आणल्यास काडीमोड देण्याची किंवा जिवे मारण्याची धमकी देत होते, असे फरीनने वेळोवेळी माहेरी सांगितले होते. २१ जुलै २०१५ रोजी आरोपींनी फरीनला पेटवून दिले, असे फरीनने रुग्णालयात काकांना सांगितले होते, असे त्यांचे म्हणणे होते. उपचार सुरू असताना फरीनचा मृत्यू झाला. याबाबत सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याची सुनावणी व शिक्षातपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एस.जी. गाढे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त सरकारी लोकअभियोक्ता सुशीलकुमार बर्वे आणि सूर्यकांत सोनटक्के यांनी १६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार वर्षा कबाडे यांनी काम पाहिले.