विवाहित मामाचा भाचीसोबत घरोबा !
By Admin | Updated: April 14, 2017 00:51 IST2017-04-14T00:49:07+5:302017-04-14T00:51:58+5:30
बीड एका विवाहित मामाने पत्नी विभक्त झाल्यानंतर अल्पवयीन भाचीसह धूम ठोकून मामा- भाचीच्या नात्याला काळिमा फासला.

विवाहित मामाचा भाचीसोबत घरोबा !
संजय तिपाले बीड
विवाह समारंभात मामाला मानाचे स्थान असते. रेशीमगाठी जुळविण्यापासून ते ‘बिदाई’पर्यंत मामाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र, येथे एका विवाहित मामाने पत्नी विभक्त झाल्यानंतर अल्पवयीन भाचीसह धूम ठोकून मामा- भाचीच्या नात्याला काळिमा फासला. अहमदनगरमध्ये विवाह उरकून या दोघांनी यवतमाळमध्ये संसार थाटला. तब्बल वर्षभरानंतर या जोडीचा पर्दाफाश करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले. मामाला गजाआड केले असून, भाचीला नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.
झाले असे, बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरात एक मजूर कुटुंब वास्तव्यास आहे. पत्नी साफसफाईची कामे करते तर पती पुणे येथे बांधकामावर मिस्त्रीकाम करतो. त्यांची मुलगी संगीता (नाव बदलले आहे) नववीच्या वर्गात शिकत होती. तिच्या वडिलांसोबत पुणे येथे तिचा चुलत मामा प्रवीण (नाव बदलले आहे) हा देखील मिस्त्रीकाम करत असे. तो मूळचा (सिंदखेड राजा, जि. बुलडाणा) येथील. त्यामुळे त्याचे बीडमध्ये चुलतबहिणीकडे नेहमी येणे- जाणे असायचे. विवाहित असलेल्या प्रवीणला दोन मुले आहेत; परंतु त्याचे पत्नीशी पटत नव्हते. पत्नीने त्याच्यावर छळाची तक्रार दाखल केलेली आहे. तेव्हापासून ती नांदत नाही. प्रकरण काडीमोडपर्यंत येऊन ठेपले आहे. दरम्यान, प्रवीणने चुलतभाची संगीताला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अल्लड संगीताही त्याच्या गोड बोलण्याला भाळली. मे २०१६ मध्ये बीडमधून संगीताला घेऊन प्रवीणने धूम ठोकली. ते थेट औरंगाबादला पोहोचले. त्यानंतर रेल्वेने अहमदनगर गाठले. तेथे त्यांनी एका मंदिरात जाऊन विवाह उरकला. नंतर पंढरपूर, मनमाड, पुणे येथे त्यांनी काही दिवस काढले. बांधकामावर मजुरी करून संसार सांभाळणारे हे दोघे गेल्या काही दिवसांपासून यवतमाळमध्ये वास्तव्यास होते.
इकडे संगीता गायब झाल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला; पण ती कुठेच आढळली नाही. चुलतमामा प्रवीणही बेपत्ता असल्याचे कळाल्यावर संगीताच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रवीणविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद झाला; परंतु औरंगाबाद सोडल्यानंतर प्रवीणने सीमकार्ड बदलले. त्यामुळे ‘लोकेशन’ मिळू शकले नाही. शिवाय सतत शहर बदलून वास्तव्य केल्याने पोलीस हतबल झाले होते. यवतमाळमधील पेठ भागात ते असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक निरीक्षक सलीम पठाण यांनी पथक रवाना केले. संगीताला बालन्यायालयाच्या आदेशान्वये तिच्या आई- वडिलांकडे सोपविले. प्रवीणला गुरुवारी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.