विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले
By Admin | Updated: July 13, 2014 00:29 IST2014-07-12T23:49:26+5:302014-07-13T00:29:01+5:30
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा येथे सासरच्या जाचास कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान ११ जुलै रोजी नांदेडच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला.

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा येथे सासरच्या जाचास कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान ११ जुलै रोजी नांदेडच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला. दरम्यान, तिचे प्रेत ग्रामीण ठाण्यासमोर आणून ठेवत नातेवाईकांनी आरोपींना अटक करा, अशी मागणी करीत संताप व्यक्त केल्यामुळे शनिवारी या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
बेलोरा येथील गोदावरी प्रकाश नागरे (वय २३) हिने ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने ती गंभीररित्या भाजली. जखमी अवस्थेत हिंगोली येथे आणल्यानंतर एका खासगी दवाखान्यात तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते.
त्याठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवारी सदरील विवाहितेचा मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी काही नातेवाईकांनी सदर विवाहितेचे प्रेत गावाकडे न नेता थेट ग्रामीण ठाण्यात आणले. गोदावरी नागरे हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे, पोनि दिलीप ठोंबळ यांनी नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सपोनि बी.के.सानप, सपोउपनि विश्वनाथ गंगावणे, एन.आर.राठोड, पोना गणपत मस्के, शेख शकील, एस.के.आढाव, उमेश जाधव, राहुल गोटरे, वानखेडे यांच पथकाने दोन आरोपींना अटक केली. याबाबत श्रीराम निवृत्ती कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश किशन नागरे, किसन नागरे, लक्ष्मीबाई किसन नागरे (तिघे रा. बेलोरा गुठ्ठे), सुनीता बाळू घुगे (रा. कोथळज), संगीता कुंडलिक कुटे (रा. दौडगाव), रंभाबाई नागोराव जायभाये (रा. गोजेगाव) यांच्याविरुद्ध कलम ३०६, ३०४ (ब) ,४९८ (अ), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
माहेराहून ५० हजार रुपये व दागिने आणण्यासाठी सासरी दोन वर्षापासून सदर विवाहितेचा छळ होत असल्याने तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल
सासरच्या जांचास कंटाळून ११ जुलै रोजी पेटवून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान नांदेड येथे झाला मृत्यू.
शनिवारी मयत विवाहितेचे प्रेत नातेवाईकांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची केली मागणी.
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी समजाविल्यानंतर पोलिस ठाण्यातील तणाव निवळला.