विवाहितेचा छळ; दोघांना कारावास
By Admin | Updated: September 23, 2014 01:34 IST2014-09-23T00:53:10+5:302014-09-23T01:34:18+5:30
औंढा नागनाथ : घर बांधण्यासाठी माहेराहून ५० हजार रूपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने पती

विवाहितेचा छळ; दोघांना कारावास
औंढा नागनाथ : घर बांधण्यासाठी माहेराहून ५० हजार रूपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने पती व सासऱ्यास कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल २२ सप्टेंबर रोजी औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिला.
कळमनुरी तालुक्यातील चाफनाथ येथील सविता (वय २२) हिचा विवाह २५ मार्च २०११ रोजी औंढा तालुक्यातील सुरवाडी येथील सखाराम साहेबराव घोंगडे (वय २६) याच्याशी झाला. सदर विवाहितेला लग्नानंतर एक महिना सासरी चांगले नांदविण्यात आले. त्यानंतर पती सखाराम घोंगडे, सासरा साहेबराव सखाराम घोंगडे (५५), सासू सुमनबाई साहेबराव घोंगडे (५०), चुलत सासरा दत्तराव सखाराम घोंगडे (३८), चुलत सासू अनिता दत्तराव घोंगडे (३२), दीर अनिल साहेबराव घोंगडे (२२) यांनी सविताचा छळ करण्यास सुरूवात केली.
सासरच्या मंडळींकडून झालेल्या त्रासाबाबत तिने औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी सखाराम, साहेबराव, सुमनबाई, दत्तराव, अनिता, अनिल घोंगडे या सहा जणांविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपासीक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. पुरी गुन्ह्याचा तपास करून सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला औंढा नागनाथ येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेंडगे यांनी खटल्याचा निकाल दिला. या प्रकरणात आरोपी सखाराम साहेबराव घोंगडे (पती), साहेबराव घोंगडे (सासरा) या दोघांना ४९८ अ भादंविनुसार दोषी ग्राह्य धरून एक महिना साधा कारावास व प्रत्येकी २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ८ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपेकी २ हजार रुपये सविता घोंगडे हिला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या खटल्यातील आरोपी सुमनबाई, दत्तराव, अनिता व अनिल घोंगडे या चौघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. महेश आहेर यांनी काम पाहिले. तर सविता घोंगडे यांच्यातर्फे अॅड. डी.एस. पाईकराव यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)