आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीशी विवाह
By Admin | Updated: August 21, 2014 01:22 IST2014-08-21T00:40:41+5:302014-08-21T01:22:54+5:30
विलास भोसले ,पाटोदा नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीशी आपल्या मुलाशी हुंडा न घेता व सर्व खर्च स्वत:च उचलत येथील

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीशी विवाह
विलास भोसले ,पाटोदा
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीशी आपल्या मुलाशी हुंडा न घेता व सर्व खर्च स्वत:च उचलत येथील एका वरपित्याने ‘विवाह गाठ बांधली’. त्यांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेमुळे या विवाह कार्यास ‘वऱ्हाडी’ही स्वखर्चाने आले होते.
पाटोदा शहरातील बंडू रामभाऊ डिडूळ (वय २५) या शेतकऱ्याने पंधरा वर्षापूर्वी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. यावेळी त्यास सुनीता (वय ३ वर्ष) ही मुलगी होती, तसेच त्याची पत्नी गर्भवती होती. बंडुच्या आत्महत्येनंतर त्याला मुलगी झाली. ही मुलगीही मूकबधीर आहे. अशा परिस्थितीत बंडूची पत्नी यमुना व दोन मुलींना तिचे मामेसासरे हरिभाऊ भोसले यांनी धीर देत त्यांच्या पालनपोषणात मदत केली.
दरम्यान, दिसामासाने वाढलेल्या सुनीताचे हात पिवळे करण्याचे वेध यमुना हिला लागले. मात्र, हलाखिची परिस्थिती असल्याने हुंडा देण्यासह थाटमाट करणे, शक्य नव्हते. अशा परिस्थितीत येथील शेतकरी बबन विश्वनाथ बामदळे यांनी समंजसपणा दाखवित, सुनीताशी आपला मुलगा सुभाष यांचा विवाह लावण्याचा निर्णय घेतला. व तशी मागणीही स्वत:च घातली. यास वधु-वर दोघांनीही सहमती दिली. यानंतर सोमवारी बबन बामदळे यांनी हुंडा न घेता व थाटमाट न करता सुभाषचा विवाह स्वखर्चाने सुनीताशी लावून दिला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीशी असा विवाह होत असल्याने माहिती शहरातील अनेकांना झाली. यावेळी वऱ्हाडींनीही स्वत:च हजेरी लावली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख, शांतीलाल कांकरिया, विष्णूपंत घोलप, गौतम जावळे, प्रा. एल. आर. जाधव, आबासाहेब पवार, बापुराव बामदळे आदींची उपस्थिती होती.