धान्य, बी-बियाणे बाजारात उलाढाल ठप्प; साऱ्यांचे डोळे आभाळाकडे!
By Admin | Updated: June 16, 2016 00:13 IST2016-06-15T23:54:51+5:302016-06-16T00:13:52+5:30
औरंगाबाद : मृग नक्षत्र सुरू होऊन सात दिवस उलटले पण अजूनही आकाशात काळे ढग दिसले नाहीत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

धान्य, बी-बियाणे बाजारात उलाढाल ठप्प; साऱ्यांचे डोळे आभाळाकडे!
औरंगाबाद : मृग नक्षत्र सुरू होऊन सात दिवस उलटले पण अजूनही आकाशात काळे ढग दिसले नाहीत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा हवामान खात्याने वेळेआधीच जोरदार पाऊस येणार, अशी भविष्यवाणी केली होती. त्या विश्वासावर शेतकऱ्यांनी धूळपेरण्या केल्या पण पहिली भविष्यवाणी खोटी ठरली आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील शिल्लक धान्य विक्रीस आणणे थांबविले आहे तसेच बी-बियाणे खरेदीसाठी ‘थांबा आणि वाट पाहा’ असे धोरण स्वीकारल्याने बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे.
हवामान खात्याने यंदा मृगनक्षत्राआधीच मान्सूनला सुरुवात होईल, असे भाकीत केले होते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. फुलंब्री ते सिल्लोड या पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी करून टाकली. तसेच पाचोड, विहामांडवा इ. भागात अवकाळी पाऊस पडल्याने तेथील काही भागांत पेरणी झाली आहे. अन्य तालुक्यात मात्र, १० ते २० टक्केच पेरणी झाली आहे. मृग नक्षत्राला ७ जून रोजी सुरुवात होते. मात्र, यंदा हवामान खात्याचा पहिला अंदाज पावसाने खोटा ठरविला व सात दिवस होऊनही मान्सून न बरसल्याने ज्या शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदीत हात आखडता घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून बी-बियाणे विक्रेत्यांच्या दुकानात शुकशुकाट जाणवत आहे. काही दुकानात तर बियाणांचे एक पाकीटही विक्री झाले नाही.
अशीच परिस्थिती जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारातही आहे. शेतकरी आपल्याकडील शिल्लक धान्य विक्री करून त्या रकमेतून बी-बियाणे, खत खरेदी करतात. पण त्वरित पावसाची शक्यता दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस आणणे थांबविले आहे. अतिअडचणीत असलेले शेतकरी गहू, ज्वारी, बाजरी विक्रीसाठी आणत आहेत. धान्य अडत बाजारातील आवक एवढी कमालीची घटली असून जिथे मागील वर्षी जून महिन्यात दररोज ३०० ते ४०० पोते आवक होत असे, तिथे सध्या १०० ते १५० पोतीच आवक होत आहे. वार्षिक धान्य खरेदी संपल्याने आता ग्राहकांनीही धान्य बाजाराकडे पाठ फिरविली आहे.