खरेदीचा दिवस नसतानाही बाजारपेठ गजबजली

By Admin | Updated: July 29, 2014 01:12 IST2014-07-28T23:43:26+5:302014-07-29T01:12:55+5:30

हिंगोली : आठवडी बाजाराचा दिवस नसतानाही रमजान ईदमुळे सोमवारी हिंगोली शहरातील बाजारपेठ गजबजली होती.

The market is still not in the days of shopping | खरेदीचा दिवस नसतानाही बाजारपेठ गजबजली

खरेदीचा दिवस नसतानाही बाजारपेठ गजबजली

हिंगोली : आठवडी बाजाराचा दिवस नसतानाही रमजान ईदमुळे सोमवारी हिंगोली शहरातील बाजारपेठ गजबजली होती. अगदी सकाळपासून सायंकाळपर्यंत मुस्लिम बांधवांनी केलेल्या खरेदीमुळे लाखोंची उलाढाल झाली. प्रामुख्याने शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या पदार्थांपासून ते अत्तरापर्यंत विविध साहित्याची खरेदी करून ईदची केली.
रमजान ईद मुस्लिम बाधवांचा सर्वात महत्त्वाचा सण. रमजानच्या प्रारंभापासून रोजा केला जातो. विविध धार्मिक कार्यांसह जकात, नमाज पठण नित्यनेमाने केले जाते. नोकरी, कामानिमित्त बाहेरगावी गेलेले सदस्य ईदसाठी घरी परततात. मागील चार दिवसांपासून लेकीबाळीपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण घराकडे परतत आहेत. ईदच्या पूर्वसंध्येला हिंगोलीत मोठ्या प्रमाणात साहित्याची खरेदी केली. प्रामुख्याने काजू, बदाम, चारोळी, इलायची, शेवया या शिरखुर्म्याचे पदार्थ विकत घेतले. योगायोगाने गत महिन्यापेक्षा भावात बऱ्यापैकी घट झाल्याने मुस्लिम बांधवांना दिलासा मिळाला. आजघडीला खारीक १४० वरून ८०, पिस्ता २०० वरून १८०, चारोळी १ हजारावरून ७००, काजू ७०० वरून ६००, खसखस ५०० वरून ४०० रुपयांपर्यंत घसरली. गत महिन्यात ७०० रूपये किलो असणाऱ्या बदामाच्या दरात ६० रुपयांची घट पहावयास मिळाली. ग्राहकांची मागणी असलेली फेनी प्रतिवर्षी हैदराबाद येथून व्यापारी मागवतात. यंदाही मोठ्या प्रमाणात मागविलेली फेनी ग्राहकांना ४० रूपयांनी स्वस्त मिळाली. मध्यंतरी एका किलोसाठी १२९ रूपये मोजावे लागत असे विक्रेता शेख बाबा शेख मेहमूद तांबोळी यांनी सांगितले.
दुसरीकडे दिवाळीच्या सणाप्रमाणे कपड्याच्या दुकानांवर गर्दी होती. बालकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने नवीन कपड्याची खरेदी केली. युवकांमध्ये फॅन्सी रेडिमेड तर प्रौढांनी पारंपरिक कपड्यांना पसंती दिली. रंगीबेरंगी नव्या डिझाईन्सच्या साड्या महिलांनी खरेदी केल्या. मुलींसह महिलांनी सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांवर गर्दी केली होती. सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही खरेदीचीही तेवढीच लगबग पहायला मिळाली. त्यामुळे हिंगोली शहरात लाखोंची उलाढाल सोमवारी झाल्याचे व्यापारी म्हणाले (प्रतिनिधी)
ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सणात अत्तराला मोठे आहे. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अत्तराची खरेदी करतात. ईदमुळे अत्तराची मागणी वाढली होती. मुंबई, कनोच, हैैदराबाद येथून आणलेले विविध प्रकारातील अत्तर विक्रेत्यांकडे उपलब्ध होते. प्रामुख्याने गुलाब, मोगरा, जन्नत-उल-फित्र, मजमोहा आदी सुगंधी अत्तरांची खरेदी ग्राहकांनी केली. गरजेनुसार ४० पासून ४०० रुपयांपर्यंतचे विक्री झाल्याचे विक्रेता अब्दुल वहीद यांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शनानंतर महिनाभर धरलेला रोजा सोडला जातो. मंगळवारी सकाळी १० वाजता हिंगोलीतील ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज अदा केली जाणार आहे. तत्पूर्वी या मैैदानाची साफसफाई करण्यात आली. नमाजानंतर एकमेकांच्या भेटी घेऊन ऐकतेचा संदेश दिला जाणार आहे. दिवसभर शिरखुर्म्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The market is still not in the days of shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.