फळभाज्यांचा बाजार बहरला
By Admin | Updated: June 5, 2017 00:32 IST2017-06-05T00:31:35+5:302017-06-05T00:32:18+5:30
औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा रविवारी चौथा दिवस होता. पण आज संपाची प्रखरता कमी झाल्याचे दिसून आले.

फळभाज्यांचा बाजार बहरला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा रविवारी चौथा दिवस होता. पण आज संपाची प्रखरता कमी झाल्याचे दिसून आले. जाधववाडीतील बाजारात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक झाली. तसेच शहरातील विविध ठिकाणच्या भाजीमंडईतही मुबलक प्रमाणात फळभाज्या विक्रीला आल्या होत्या. एवढेच नव्हे तर रविवारचा आठवडी बाजारही नेहमीप्रमाणे भरला होता. तेथे मात्र पालेभाज्यांची कमतरता काही प्रमाणात जाणवली.
शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी काही व्यापाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींना मारहाण केली होती. परिणामी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आज संपाचा चौथा दिवस; त्यातही रविवार असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून पहाटेपासूनच जाधववाडीतील फळ-भाजीपाल्याच्या अडत बाजारात बंदोबस्त लावला होता. आसपासच्या ग्रामीण भागातून २० ते ३० हजार गड्ड्या पालेभाज्यांची आवक झाली. नेहमीच्या तुलनेत ७० टक्क्यांनी आवक कमी होती. पण फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जिल्ह्यातूनच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातूनही फळभाज्या घेऊन गाड्या शहरात दाखल झाल्या. टोमॅटोची सर्वाधिक आवक रविवारी झाल्यामुळे अडत बाजारात सर्वत्र लाल टोमॅटोच दिसून येत होते. अडत व्यापारी इलियास बागवान यांनी सांगितले की, १६० टन टोमॅटोची आवक झाली. काल ५०० ते ६०० रुपये प्रती कॅरेट (२० किलो) विक्री होणारे टोमॅटो आज आवक वाढल्याने २०० ते २५० रुपये विक्री झाले. आग्राहून २०० टन बटाट्यांची आवक झाली. तर ५०० पोते कांदाही बाजारात आला. टोमॅटोची एवढी आवक झाली की, त्यातील सुमारे २० टन माल विक्रीविना शिल्लक राहिला होता. त्यातील खराब झालेला सुमारे ३ टन टोमॅटो अडत्यांनी फेकून दिले.
जाधववाडीत शनिवारी शुकशुकाट होता. रविवारी संपूर्ण बाजार विक्रेते, ग्राहकांनी बहरून गेला होता. ३०० पेक्षा अधिक विक्रेते व हजारांच्या जवळपास ग्राहक येथे आले होते.
आवक वाढल्याने फळभाज्यांचे भावही किलोमागे १० ते ३० रुपयांपर्यंत कमी झाले. किरकोळ विक्रीत टोमॅटो २० रुपये, वांगे, भेंडी ३० रुपये, गवार ४० रुपये, काकडी २० रुपये, सिमला मिरची ४० रुपये, दुधी भोपळा १५ ते २० रुपये, चवळी ४० रुपये, लिंबू २० रुपये प्रतिकिलो विक्री झाले.
आज पालेभाज्या तसेच फुलकोबी, श्रावणघेवडा कमी प्रमाणात आला होता. रविवार असल्याने जाधववाडीत आज ग्राहकही मोठ्या संख्येने पालेभाज्या खरेदीसाठी आले होते. यामुळे दररोज १० वाजेपर्यंत चालणाऱ्या या बाजारात आज दुपारी १ वाजेपर्यंत ग्राहकांची गर्दी होती.
भाज्यांच्या हातगाड्या गल्लीबोळांत
जाधववाडीत मुबलक प्रमाणात फळभाज्यांची आवक झाल्याने रविवारी सिडको-हडको, जवाहर कॉलनी, मुकुंदवाडी आदी भागातील कॉलन्यांमध्ये हातगाडीवाले भाज्या विकताना दिसून आले. शेतकऱ्यांच्या संपामुळे मागील दोन दिवसांपासून भाज्यांची आवक घटल्याने हातगाडीवाले गायब झाले होते.