बाजार समितीचा ‘प्रादेशिक’ दर्जा काढला
By Admin | Updated: September 6, 2014 00:41 IST2014-09-06T00:41:35+5:302014-09-06T00:41:53+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेतील कृषी उत्पन्न बाजार समितीचा ‘प्रादेशिक’ दर्जा काढून घेण्यात आला

बाजार समितीचा ‘प्रादेशिक’ दर्जा काढला
औरंगाबाद : औरंगाबादेतील कृषी उत्पन्न बाजार समितीचा ‘प्रादेशिक’ दर्जा काढून घेण्यात आला असून, पुन्हा ही बाजार समिती तालुकास्तरावरील झाली आहे. या निर्णयामुळे करमाड तालुका बाजार समिती रद्द होऊन ती आता उपबाजार समिती म्हणून ओळखल्या जाणार आहे.
पूर्वी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद तालुक्यापुरतीच मर्यादित होती. मात्र, १३ जानेवारी २०११ रोजी या बाजार समितीला प्रादेशिक दर्जा देण्यात आला. या बाजार समितीच्या अंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश झाला होता. येथे लोकनियुक्त संचालक मंडळ आले असते तर प्रत्येक तालुक्यातील बाजार समितीच्या एका प्रतिनिधीची संचालक म्हणून येथे नेमणूक झाली असती; पण येथे प्रशासक नेमण्यात आल्याने निवडणुका झाल्याच नाहीत. बाजार समितीच्या जागेवर औरंगाबाद तालुका बाजार समितीची मालकी व संचालक अन्य तालुक्यातील, त्यामुळे येथील नागरिकांनी त्यास विरोध करणे सुरू केले. यामुळे शासनाने ४ डिसेंबर २०१२ रोजी करमाड बाजार समितीला तालुक्याचा दर्जा दिला होता; पण सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहसचिवाने ४ सप्टेंबर २०१४ रोजी एक आदेश काढून औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा ‘प्रादेशिक दर्जा’ काढून घेतला व पुन्हा ही बाजार समिती तालुकास्तरावरील झाली आहे. तसेच करमाड बाजार समितीचा तालुक्याचा दर्जा काढून घेतला आहे.
१८३ गावांचा समावेश होणार
आता औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करमाड व राजापिंप्री हे दोन उपबाजार असणार आहेत, तसेच या बाजार समितीच्या अंतर्गत छावणी व मनपा हद्द वगळता १८३ गावांचा समावेश होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एन. व्ही. आघाव यांनी दिली.