बाजार समिती सचिवांना नोटीस

By Admin | Updated: April 8, 2017 21:43 IST2017-04-08T21:40:56+5:302017-04-08T21:43:59+5:30

लातूरशासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने बाजार समित्यांत तुरीची खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

Market committee secretary notice | बाजार समिती सचिवांना नोटीस

बाजार समिती सचिवांना नोटीस

हरी मोकाशे लातूर
शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने बाजार समित्यांत तुरीची खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक बी.एल. वांगे यांनी जिल्ह्यातील अकराही बाजार समिती सचिवांना केल्या आहेत.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तुरीचे पीक भरघोस आल्याने बाजार समितीत तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. आवक वाढताच भाव घसरला. दरम्यान, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनाने तुरीला ५ हजार ५० रुपये असा हमीभाव जाहीर केला. नाफेड व विदर्भ मार्केटिंग को-आॅपरेटिव्ह फेडरेशन यांच्या मार्फत जिल्ह्यात ९ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. दरम्यान, हमीभाव खरेदी केंद्रावर वेळेवर तुरीचे मापतोल होत नसल्याने काही शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये तूर विक्रीसाठी आणली. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली. याच कालावधीत काही शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समिती सचिवांची जिल्हा उपनिबंधक वांगे यांनी बैठक घेऊन हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत तुरीचे सौदे सुरूच राहिले.
दरम्यान, बाजार समित्यांत तुरीची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येत असल्याचे पुन्हा निदर्शनास आले. त्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा उपनिबंधक वांगे यांनी लातूरसह जिल्ह्यातील औसा, निलंगा, औराद शहाजानी, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ येथील बाजार समिती सचिवांना नोटिसा बजावल्या आहेत.

Web Title: Market committee secretary notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.