मारहाणीतील जखमीचा मृत्यू

By Admin | Updated: May 25, 2015 00:25 IST2015-05-25T00:16:52+5:302015-05-25T00:25:28+5:30

शिराढोण : नोकरीचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका वृध्दाच्या डोक्यात काठीने वार करून जबर जखमी केल्याची घटना शिराढोण येथे ४ मे रोजी घडली होती.

Marital death death | मारहाणीतील जखमीचा मृत्यू

मारहाणीतील जखमीचा मृत्यू



शिराढोण : नोकरीचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका वृध्दाच्या डोक्यात काठीने वार करून जबर जखमी केल्याची घटना शिराढोण येथे ४ मे रोजी घडली होती. दरम्यान, यातील गंभीर जखमी वृध्दाचा २३ मे रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असून, याप्रकरणी एकाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिराढोण येथील गणप्या ऊर्फ गणपत रामभाऊ होनमाने (वय ३५) हा दगडू यशवंत देवकते (वय ७७) यांच्याकडे शेतात सालगडी म्हणून कामास होता. देवकते यांनी होनमाने यास ठरलेल्या रकमेपेक्षा जादा पैसे उचल म्हणून दिले होते. कालांतराने देवकते यांनी आगाऊ रकमेची मागणी होनमाने याच्याकडे केली होती. याचाच राग मनात धरून गणपत होनमाने याने ४ मे रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास देवकते हे त्यांच्या शेतातील गोठ्यात झोपले असताना तेथे जावून त्यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हातावर, पायावर तसेच डोक्यात काठीने वार झाल्यामुळे देवकते हे गंभीर जखमी झाले. यानंतर होनमाने याने घटनास्थळावरून पोबारा केला.
दरम्यान, देवकते यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ दगडू देवकते यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वीस दिवस देवकते हे मृत्यूशी झुंज देत होते. अखेर २३ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दगडू देवकते यांचा मुलगा कल्याण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणप्या ऊर्फ गणपत रामभाऊ होनमाने याच्याविरुध्द रविवारी शिराढोण पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अवये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)
दगडू देवकते यांच्या खून प्रकरणी रविवारी पहाटेच्या सुमारास शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवित आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. यावेळी गणपत होनमाने हा येडशी येथे राकेश माकोडे यांच्या शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तेथे छापा टाकून तात्काळ त्यास जेरबंद केले. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह पोना सुधीर तुगावकर, संजय नायकल, राजेंद्र स्वामी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Marital death death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.