वेतनश्रेणीतील तफावत; ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन
By Admin | Updated: June 29, 2014 00:25 IST2014-06-29T00:11:22+5:302014-06-29T00:25:07+5:30
नांदेड: ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याबाबत राज्य शासन उदासीनता दाखवित असल्याच्या निषेधार्थ राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्ह्यात २ जुलैपासून कामबंद

वेतनश्रेणीतील तफावत; ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन
नांदेड: ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याबाबत राज्य शासन उदासीनता दाखवित असल्याच्या निषेधार्थ राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्ह्यात २ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य ग्रामसेवक युनियनचे नेते एऩडी़ कदम यांनी दिली़
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे कालबद्ध पदोन्नतीमध्ये त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गात नाराजी पसरली आहे. वर्षभरात अनेकवेळा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन, मोर्चा, कामबंद आंदोलन करण्यात आले. परंतु याबाबतचा तोडगा मात्र अद्यापही निघाला नाही.८७ हून अधिक मूळ कामे सांभाळत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामसेवकांमार्फत केली जाते. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या जवळपास १३८ योजनांचा भार ग्रामसेवकांवर आहे. गेल्यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीत राज्यातील ग्रामसेवकांनी एक दिवसाचे वेतन देत दुष्काळग्रस्त भागात अत्यवस्थ सुविधा पुरविण्याचे काम केले. राज्यात कुठेही मोर्चा, धरणे, रास्तारोको झाला नाही. तरीही शासनाने ग्रामसेवक संवर्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वेतनश्रेणीतील तफावतीकडे दुर्लक्ष केले. ग्रामसेवकांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करावी, ग्रामपंचयात स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ सेवेत रुजू झाल्यापासून ग्राह्य धरावा, २० ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी (पंचायत) पद निर्माण करावे, सर्व संवर्गाकरिता बदलीचे धोरण एकच करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
ग्रा.पं. च्या चाव्या, शिक्के परत करणार
या आंदोलनाअंतर्गत ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २ जुलै रोजी सर्व ग्रामपंचायतींच्या चाव्या, शिक्के संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येतील आणि त्यानंतर विभागनिहाय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. १४ व १५ जुलै रोजी औरंगाबाद विभागातील ग्रामसेवक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे मानद अध्यक्ष श्यामराव मुत्यालवार, सचिव पी. जे. नागेश्वर, उत्तम देशमुख आदींनी केले आहे.
पाचव्या वेतन आयोगात ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीत फरक होता. मात्र सहाव्या वेतन आयोगात ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी एकाच वेतनश्रेणीत आले. ही तफावत दूर करणे आवश्यक आहे.- एन. डी. कदम
विभागीय अध्यक्ष, राज्य ग्रामसेवक युनियन