मराठवाड्यात पावसाच्या तुलनेत पेरणी कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:26+5:302021-06-24T04:04:26+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात जूनमध्ये झालेल्या पावसाच्या सरासरीचा आकडा मोठा असूनही त्या तुलनेत पेरण्यांचा टक्का मात्र घसरलेला आहे. पावसाच्या सरासरीवर ...

In Marathwada, sowing is less than rainfall | मराठवाड्यात पावसाच्या तुलनेत पेरणी कमीच

मराठवाड्यात पावसाच्या तुलनेत पेरणी कमीच

औरंगाबाद : मराठवाड्यात जूनमध्ये झालेल्या पावसाच्या सरासरीचा आकडा मोठा असूनही त्या तुलनेत पेरण्यांचा टक्का मात्र घसरलेला आहे. पावसाच्या सरासरीवर हवामानतज्ज्ञांना संशय आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनीदेखील पुरेशा पावसाअभावी पेरण्या लांबविल्या आहेत. नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटात स्थिरावल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि काही भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादेत पाऊस मंदावला आहे.

गेल्यावर्षी २३ जूनपर्यंत २५ टक्क्यांच्या पुढे पेरण्या झाल्या होत्या. यावर्षी आठही जिल्ह्यात १२ टक्क्यांच्या आसपास पेरण्या झाल्या आहेत. औरंगाबाद आणि नांदेड जिल्हा वगळता सर्वत्र कमी पेरण्या झाल्याने खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी-अधिक पाऊस झाल्याने पेरण्यांवर परिणाम झाला आहे. खत, बियाणे आणि शेतीच्या कामांवर शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली असून पुरेशा पावसाची आता प्रतीक्षा आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीत आणि अन्यधान्याची पेरणी मराठवाड्यात खरीप हंगामात होते. ४७ लाख ८७ हजार ६७ पैकी फक्त ५ लाख ३० हजार ७९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हवामानतज्ज्ञांचे मत असे

पावसाची नोंद घेण्यासाठी नोंदणी केंद्रे वाढविण्यात यावीत, असे मत हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी घाई करू नये. नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात या आठवड्यात पाऊस होईल. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पावसाने दडी मारली आहे. एका तालुक्यात पाऊस झाला तर पूर्णत: तालुक्याची नोंद घेणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी हवामानखात्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीवरही संशय घेतला.

विभागाचा पेरणी टक्का असा

औरंगाबाद -१६ टक्के, जालना - ७ टक्के, बीड - ७ टक्के, लातूर - ०.२६ टक्के, उस्मानाबाद - ११ टक्के, नांदेड - १९ टक्के, परभणी - १३ टक्के, हिंगोली - १७ टक्के मिळून एकूण- १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

मराठवाड्यात झालेला पाऊस

औरंगाबाद ९४ मि.मी., जालना १२४ मि.मी., बीड १४२ मि.मी., लातूर १४३ मि.मी., उस्मानाबाद १०० मि.मी., नांदेड १४२ मि.मी., परभणी १७९ मि.मी., हिंगोली १३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जुन महिन्यातील सरासरीच्या तुलनेत १४० मि.मी. पाऊस विभागात झाला आहे.

विष्णुपुरी वगळता सर्व धरणांना पावसाची प्रतीक्षा

नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण वगळता सर्व धरणांना पावसाची प्रतीक्षा आहे. जायकवाडीत ३२ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे. निम्न दुधना ५५, येलदरी ५५, सिध्देश्वर १६, माजलगांव १८, मांजरा १८, पैनगंगा ४८, मानार ३६, निम्न तेरणा ४१, विष्णुपुरी ९०, तर सिना कोळेगांव बंधाऱ्यात २ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मागीलवर्षी १ हजार ७२७ दलघमी उपयुक्त जलसाठा सर्व धरणांमध्ये होता. यावर्षी २ हजार २६ दलघमी इतका उपयुक्त जलसाठा धरणांत आहे.

Web Title: In Marathwada, sowing is less than rainfall