मराठवाडा खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 00:09 IST2016-08-01T00:03:40+5:302016-08-01T00:09:20+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मराठवाडा खड्ड्यात
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान झाले, याचा अहवाल तयार केला जात असून, खड्ड्यांमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किमान २२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सूत्रांकडून मिळाली आहे.
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या सुमारे २१ हजार किलोमीटरपैकी ४ हजार कि़ मी. रस्ते खराब झाले आहेत. खड्डे दुरुस्तीसाठी व पावसाळ्यात क्षती पोहोचणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २२०० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, खचलेल्या रस्त्यांचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचा खर्च या निधीतून करण्यात येईल. मुख्य अभियंता एम. एम. सुरकटवार यांनी याप्रकरणी सर्व अधीक्षक अभियंत्यांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
राज्य निधीतून बांधण्यात आलेले मोठे रस्ते, त्यानंतर राज्य महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर पावसाळ्यात व त्यापूर्वी खड्डे पडले असतील तर त्यातील काही रस्त्यांचे नूतनीकरण किंवा मजबुतीकरणाचे काम पावसाळ्यानंतरच हाती घेण्यात येईल. ज्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडतील. त्यांची डागडुजी तातडीने करण्यासाठी विभागाने तयारी केली आहे.
विभागात केंद्र शासन, राज्य शासनाचे मिळून ६५ हजार ४९७ किलोमीटर रस्ते आहेत. १२ हजार २५२ जिल्हा रस्ते आणि ३१ हजार ३६८ किलोमीटर ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे आहेत. २१ हजार किलोमीटर रस्ते बांधकाम, तर ८१६ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची देखभाल केंद्र शासन करते. मराठवाडा विभागात जुलैअखेरपर्यंत ५१.९ टक्के पाऊस सरासरीच्या तुलनेत झाला आहे. सर्वच जिल्ह्यांत पाऊस झाला असून, रस्त्यांचे नुकसान झाले आहे.