पावसाळ्यातही मराठवाड्याच्या घशाला कोरड
By Admin | Updated: August 8, 2014 01:23 IST2014-08-08T01:11:21+5:302014-08-08T01:23:53+5:30
औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. उलट दिवसेंदिवस विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे.

पावसाळ्यातही मराठवाड्याच्या घशाला कोरड
औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. उलट दिवसेंदिवस विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत विभागातील ९२६ गावांना ७२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ११४४ गावांची तहान त्या-त्या परिसरातील विहिरी अधिग्रहित करून भागविण्यात येत आहे.
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसावर पिके तग धरून आहेत. मात्र, भूजल पातळी खालावल्याने, तसेच सर्व प्रकल्प कोरडे पडल्यामुळे विभागातील पाणीटंचाई कायम आहे. उलट टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापर्यंत ९२० गावांना ७१९ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्यामुळे टँकरची संख्याही ४ ने वाढली आहे. सध्या विभागात ९२६ गावांना ७२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत सर्वाधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३२२ टँकर सुरू आहेत. तर बीड जिल्ह्यातील टँकरची संख्याही २३४ वर पोहोचली आहे. परभणी जिल्ह्यात मात्र, सध्या एकही टँकर सुरू नाही. तसेच हिंगोली जिल्ह्यात अवघे २ टँकर सुरू आहेत.
३९ तालुक्यांमध्ये तीव्र टंचाई
सर्वच जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवत असली तरी काही तालुक्यांमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ३९ तालुक्यांमध्ये भीषण स्वरूपाची पाणीटंचाई जाणवत आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८, जालना जिल्ह्यातील ५, हिंगोली जिल्ह्यातील २, नांदेड जिल्ह्यातील ६, बीड जिल्ह्यातील ८, लातूर ४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत.
टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी ठिकठिकाणी विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. मराठवाड्यात १४८१ गावांमध्ये एकूण २०३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
४बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४९५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ४४८, नांदेड जिल्ह्यात ३९६, औरंगाबाद जिल्ह्यात ३४१, जालना जिल्ह्यात १३०, लातूर जिल्ह्यात १५७, हिंगोली जिल्ह्यात ५२ आणि परभणी जिल्ह्यात १४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.