मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST2021-09-27T04:04:57+5:302021-09-27T04:04:57+5:30
औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत ...

मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख
औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत महाराष्ट्र वगैरे अशी काही संकल्पना नव्हती. मराठवाडा हीच महाराष्ट्राची ओळख होती. या मराठवाड्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप मंत्री आव्हाड यांच्या उपस्थितीत संत जनाबाई व्यासपीठावर रविवारी सायंकाळी झाला. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, किरण सगर, कुंडलिक अतकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. कैलास अंभुरे, राधाबाई बिरादार, नीलेश राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी मंत्री आव्हाड म्हणाले, मराठवाड्यातील गंगाधर पानतावणे, रा.रं. बोराडे, अनुराधा पाटील अशी कितीतरी नावे घेता येतील, त्यांनी संत जनाबाई, बहिणाबाई, तुकारामांसह इतरांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. मराठी भाषेचा उगम गोदावरीच्या खोऱ्यात झाला. मराठीला राजभाषेचा दर्जा यादवांनी दिला; परंतु आज आपण तो देऊ शकत नाही. मलिक अंबरांनी औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तो आजच्या कोणत्याही जलसंपदा मंत्र्यांना सोडवता येणार नाही. झुंडशाहीला राजमान्यता मिळत आहे. झुंडशाही नेहमीच प्रागतिक विचारांच्या विरोधात असते. त्यामुळे या झुंडशाहीला विरोध लेखकांसह वाचकांनीही केला पाहिजे, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले.
संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांनी समारोपाचे भाषण केले. प्रस्ताविक डॉ. राम चव्हाण यांनी केले. स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी संमेलन जगभर पोहोचविण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. कौतिकराव ठाले पाटील यांनी कमी कलावधीत संमेलन यशस्वी करून दाखविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम केल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते डॉ. योगिता तौर पाटील, प्रा. अशोक बंडगर, राजेंद्र वाळके, प्रा. राजेंद्र भगत व योगेश कवडे यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट..
इथल्या चळवळींचा अस्त
महाराष्ट्र हा चळवळीचा प्रदेश आहे. या भागात दलित, आर्यसमाज, सत्यशोधक अशा अनेक चळवळींची परंपरा होती. या चळवळी आज संपल्या आहेत. दलित चळवळीतील नामदेव ढसाळ, राजा ढाले आदींची नावे घेतली की अंगावर काटा यायचा, आज असा दरारा राहिलेला नाही. यासाठी आपणच जबाबदार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असल्यामुळे तेथे जाण्यासाठी रेल्वे असावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.