विशाखा पुरस्कारावर मराठवाड्याची मोहोर

By Admin | Updated: September 24, 2014 01:05 IST2014-09-24T00:52:35+5:302014-09-24T01:05:08+5:30

औरंगाबाद : ‘विशाखा पुरस्कार’ यंदा मराठवाड्यातील तीन नव्या दमाच्या कवींना जाहीर झाला आहे.

Marathwada blossom on Vishakha Award | विशाखा पुरस्कारावर मराठवाड्याची मोहोर

विशाखा पुरस्कारावर मराठवाड्याची मोहोर

औरंगाबाद : कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘विशाखा पुरस्कार’ यंदा मराठवाड्यातील तीन नव्या दमाच्या कवींना जाहीर झाला आहे. कवीच्या पहिल्या कविता संग्रहाला तो दिला जातो. येत्या नोव्हेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यानिमित्ताने या कवींनी केलेल्या अक्षरप्रवासाचे हे ओथंबलेले शब्दरूप!
करुणेची माणूसगाथा!
मी ज्या ग्रामीण पर्यावरणात जन्माला आलो त्याचा आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. वडिलांमुळे वारकरी परंपरेची श्रीमंत किनार माझ्या अभिव्यक्तीला मिळाली. अभंगाच्या आर्त लयीचा संस्कार झाला. पिढ्यान्पिढ्या काबाडकष्ट करणाऱ्या माणसांच्या भावभावनांचे बंध माझ्या आंतरिक लयीला संस्कारित करतात. या अनुबंधाच्या एकात्मतेतूनच माझी कविता जन्माला येते. कविता ही मनोरंजनाचे साधन नसून जगणे समृद्ध करणारी पायवाट असते. कविता माणसाच्या अपार करुणेतून जन्म घेत त्याच्या आदर्श अस्तित्वाचे स्वप्न पाहते. त्याला जोखडातून मुक्त करण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध पेटून उठते. सृजनाची शक्यता ही काही दैवी असते असे मला वाटत नाही; पण ती दुर्मिळ असते, इतकेच. जागतिकीकरणाच्या या काळात विविध आव्हाने निर्माण झाली असली तरी अशा वेळी केवळ कविताच मानवी मूल्यांचा निर्मळ झरा जिवंत ठेवू शकते.
रवी कोरडे (धूसर झालं नसतं गाव)
गावपांढरीची विरहव्यथा!
माझे मूळ गाव परभणीजवळचे सायाळा. १९७२ साली झालेल्या कृषी विद्यापीठाच्या उभारणीत माझ्या गावासकट पाच गावांच्या जमिनी संपादित झाल्या. यात विस्थापितांचे दु:ख माझ्यासकट अनेकांच्या वाट्याला आले. गाव सुटल्याचा, आपण गुढेकरू (विस्थापित) झाल्याचा सल उरात घेऊन प्रत्येक जण आल्या दिवसाला सामोरा गेला. बापाची बहरात आलेली कुणबिक मोडली.
पुढच्या शिक्षणासाठी मला मिळालेल्या नव्या गावातूनही बाहेर पडावे लागले. निवासी शाळेत शिकलो. नोकरी लागल्यावर शहर जवळ केले. या अस्थिरतेत आपली म्हणावी अशी जागा मला गवसेना. मात्र, कवितेने जगण्याचे दोर हातात घेतले तशी आधाराची जागा सापडत गेली. तिने करमण्याचे ठिकाण मिळवून दिले. शेतकरी- वारकरी कुटुंबातला माझा जन्म.
घरची परिस्थिती जेमतेम; मात्र टाळ, मृदंगाचा ठेका, बौद्धवाड्यातील भीमगीते, लोकसंगीत आणि सतत भोवताली असणारा बहुरूपी निसर्ग यांचा वैभवी स्पर्श माझ्या कवितेला आहे.
बिनचेहऱ्याच्या गावाची मूकबधिर वेदना माझ्या आत रटरटत होती. ‘सालोसाल’मधून तिला शब्दरूप मिळाले!
केशव खटिंग (सालोसाल)
सावली बनून वावरणारी ती!
लहानपणी गावातल्या मंदिरातली भजने कानावर यायची. शेतात गेलो की आईसोबत तिच्या मैत्रिणी ओव्या गायच्या. माझ्या आयुष्यावर पडलेल्या या कवितेच्या पहिल्यावहिल्या सावल्या. मूळचा मी मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरचा. बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचा. बारावीपर्यंत या अठरापगड जातींच्या खेड्यात वाढलो.
जगण्याची बरीवाईट रूपे, माणसांची सुखदु:खे यांच्या सान्निध्यात वावरलो. या साऱ्यांचे मनातले प्रतिरूप पकडतानाच लिहू लागलो. मला कविता नव्या रूपात भेटली ती औरंगाबादेत. तिने येथे कात टाकली. कवितेने मित्र दिले. विवेकानंद व स.भु. महाविद्यालयाच्या कट्ट्यावर आणि होस्टेलमध्ये असंख्य वेळा कविता वाचल्या. कविता कुठल्या जातीधर्माची नाही; केवळ माणसाची असू शकते.
कविता म्हणजे दु:खाला सुंदर करीत जगण्याची जीवनशैली! उर्दू कवी गालीब, संत तुकाराम ही या जीवनशैलीची उत्तम उदाहरणे. काळ अंगावर धावून आला तेव्हा कविताच पाठीशी उभी राहिली. कवितेने दृष्टी दिली, धैर्य दिले. ती माझ्या हाती लागली आहे, असा माझा अजिबात दावा नाही; पण हो, तिची सावली मात्र कायम वावरते माझ्यातून!
वैभव देशमुख (तृष्णाकाठ)

Web Title: Marathwada blossom on Vishakha Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.