भापकरांनी घेतला मराठवाडा दत्तक
By Admin | Updated: January 2, 2016 23:52 IST2016-01-02T23:39:16+5:302016-01-02T23:52:45+5:30
औरंगाबाद : जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा विचार आहे. या सर्वेक्षणामध्ये जवळपास

भापकरांनी घेतला मराठवाडा दत्तक
औरंगाबाद : जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा विचार आहे. या सर्वेक्षणामध्ये जवळपास ८१५ स्वयंसेवी संस्था आणि ३ लाख ५० हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीनुसार चांगले काम सुरू असल्यामुळे शिक्षण आयुक्त भापकर यांनी आता संपूर्ण मराठवाड्यातील जि.प. शाळा दत्तक घेण्याचा मानस येथे बोलून दाखविला.
शनिवारी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे, सहायक उपसंचालक भाऊसाहेब तुपे, शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, विभागातील विविध जिल्ह्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे. ज्ञानरचनावाद अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास वाढीस लागला पाहिजे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका शिक्षण आयुक्त भापकर यांनी बैठकीत मांडली. यापूर्वी झालेल्या शाळाबाह्य सर्वेक्षणामध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे आता स्वयंसेवी संस्था आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांमार्फत जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याआठवड्यात हे सर्वेक्षण होईल. एनएसएसच्या विद्यार्थ्यांना कॉलेज करून केवळ शनिवार, रविवार असे दोन दिवस सर्वेक्षणामध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत शैक्षणिक गुणवत्तावाढीची जबाबदारी ही सर्वांची आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विविध प्रयोग राबविण्यात येत आहेत. प्रत्येक शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांना प्राथमिकच्या शंभर व माध्यमिकच्या शंभर शाळांचे टार्गेट देण्यात आले आहे. शिक्षक मोठ्या प्रमाणात टेक्नोसॅव्ही झाले आहेत; परंतु अधिकारी तुलनेने कमी पडत आहेत. अधिकाऱ्यांनादेखील आता टेक्नोसॅव्ही व्हावे लागेल असे ते म्हणाले.