मॅरेथॉन सरावाला आलेल्या चिमुकलीला टिप्परने उडविले !
By Admin | Updated: January 20, 2017 23:54 IST2017-01-20T23:52:35+5:302017-01-20T23:54:41+5:30
लातूर : मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या मुलीला भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी डली.

मॅरेथॉन सरावाला आलेल्या चिमुकलीला टिप्परने उडविले !
लातूर : शहरात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या अकरा वर्षीय शाळकरी मुलीला भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता घडली. या अपघातामध्ये मुलगी ठार झाली. पोलिसांनी टिप्पर चालकास अटक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शहर वाहतूक व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या. दिवसभर सोशल मीडियावरून वाहतूक शाखेच्या व्यवस्थेवर टीकेची झोड होती.
लातूर शहरातील हत्ते नगरातील शाळकरी मुलगी प्रचिती विपीन कोचेटा (१३) ही शहरात एका संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करीत होती. नेहमीप्रमाणे प्रचिती क्रीडा संकुलाच्या दिशेने धावत निघाली होती. शिवाजी चौकाकडून भरधाव वेगात आलेल्या (एम. एच. ३१ ए. पी. ११०२) या टिप्परच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील टायरखाली सापडल्याने ती जागीच ठार झाली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी टिप्पर चालक नन्नू महमंद भांगे (४० रा. अंदोरा ता. औसा) याला अटक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईसमोरच झाला अपघात...
मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रचिती दररोज पहाटे नियमित धावण्याचा सराव करीत होती. सोबतीला आईही होती. हत्तेनगर ते क्रीडा संकुल या मार्गावर ती दररोज हा सराव करीत होती. आई सोबत असायची. अपघाताच्या वेळी आई तिच्या पाठीमागे स्कुटी चालवत लेकीचा सराव पाहत होती. शिवाजी चौक ते क्रीडा संकुल या मार्गावर पाठीमागून आलेल्या भरधाव टिप्परने आपल्या डोळ्यांदेखत चिमुकलीला चिरडले. या भीषण अपघातानंतर मुलीला आईने रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.